
लातूर, 05 फेब्रुवारी (हिं.स.) – राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत उच्च शिक्षण घेणाऱ्या, पण वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 साठी दोन नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत – सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना.
या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. महसुली विभागानुसार, शहर आणि ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी 43,000 रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना 38,000 रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना हे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असावे आणि वसतिगृह प्रवेशास पात्र असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसणे, तसेच विद्यार्थी ज्या शहरात शैक्षणिक संस्था आहे त्या शहराचा स्थानिक रहिवासी नसणे आवश्यक आहे. विद्यार्थीने बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेतलेले असावे आणि बारावीत किमान 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत https://hmas.mahait.org
या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी, तर इतर पात्र विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी भगवान केंद्रे (मो. 9561109018) यांच्याशी संपर्क साधावा, असे सहायक संचालक अभय अटकळ यांनी आवाहन केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis