कापड साहित्य हातमाग महामंडळाकडून खरेदी करण्याचे आवाहन
परभणी, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। हातमाग विणकरांना नियमित रोजगार उपलब्ध करून देणे तसेच परंपरागत हातमाग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळामार्फत तयार करण्यात येणारे कापड साहित्य
कापड साहित्य हातमाग महामंडळाकडून खरेदी करण्याचे आवाहन


परभणी, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।

हातमाग विणकरांना नियमित रोजगार उपलब्ध करून देणे तसेच परंपरागत हातमाग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळामार्फत तयार करण्यात येणारे कापड साहित्य जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, दवाखाने व वसतिगृहांनी खरेदी करावे, असे आवाहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

शासकीय व निमशासकीय कार्यालये, दवाखाने व वसतिगृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये सत्कारमूर्ती तसेच मान्यवर पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी हातमाग महामंडळाकडे कापडी गुलदस्ते, करवती व पैठणी स्टोल, दुपट्टे, हिमरू शाल, पैठणी साड्या तसेच पर्स उपलब्ध आहेत. कापडी गुलदस्त्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कापड वस्तू दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असून पर्यावरणपूरक आहेत. सदर साहित्य महामंडळाकडून खरेदी केल्यास हातमाग या पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन मिळणार आहे.

कापड खरेदीसाठी मुख्य भांडार विक्री केंद्र, उमरेड रोड, नागपूर येथील www.mahahandloom.com या संकेतस्थळावर तसेच mshcngp@yahoo.com या ई-मेलवर किंवा 9579837740 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

राज्य शासनाच्या दि. 18 एप्रिल 2018 रोजीच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित, नागपूर यांना विदर्भ, मराठवाडा विभाग तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये शासकीय पुरवठ्यासाठी कार्यक्षेत्र निश्चित करून देण्यात आले आहे. तसेच हातमाग उद्योग टिकवून ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालयाच्या दि. 3 सप्टेंबर 2008 च्या आदेशानुसार 11 प्रकारचे साहित्य आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामध्ये बेडशीट, चादर, दरी, टॉवेल, कंबल व ड्रेस मटेरियल यांचा समावेश आहे. या साहित्याचे उत्पादन हातमाग महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन तसेच मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना, मुंबई यांच्या दरनिश्चितीबाबत दि. 19 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय पुरवठ्यास मिळालेल्या मान्यतेच्या अधीन राहून शासकीय व निमशासकीय कार्यालये, दवाखाने व वसतिगृहांनी आवश्यक कापड साहित्य महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित, नागपूर यांच्याकडून खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande