रत्नागिरी : 'अमृत'च्या ड्रोन प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, 5 फेब्रुवारी, (हिं. स.) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ''अमृत''च्या ड्रोन प्रशिक्षणाचा लाभ संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमृत ही शासनाची स्वायत्त संस्था असून, तिचे मुख्यालय पुण्यात आहे. खुल्य
रत्नागिरी : 'अमृत'च्या ड्रोन प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन


रत्नागिरी, 5 फेब्रुवारी, (हिं. स.) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात 'अमृत'च्या ड्रोन प्रशिक्षणाचा लाभ संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत ही शासनाची स्वायत्त संस्था असून, तिचे मुख्यालय पुण्यात आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी 'अमृत ड्रोन मिशन' या नावाने मोहीम राबवली जाते.

या मोहिमेअंतर्गत दर्जेदार ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाची कीर्ती गोव्यापर्यंत पोहोचली आहे. तीस अधिकाऱ्यांना अमृत संस्थेने या संदर्भातील प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी गोवा सरकारने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव गोवा सरकारने मंजूर केला आहे.

या दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ राज्यातील लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांनी घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. (संपर्क क्रमांक 9730151450) अमृत’चे संकेतस्थळ https://mahaamrut.org.in/ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, लक्ष्यित घटकांसाठी तो मोफत राबवला जातो. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ आजपर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून, त्यातील काही जणांनी यातून प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारे चांगली कमाई करण्यासही सुरुवात केली आहे. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते. ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बनिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande