
परभणी, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
श्री गजानन महाराज यांच्या प्रगटदिनोत्सवानिमित्त दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान परभणी येथे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय उत्सव कौस्तुभ मंगल कार्यालय, संत दासगणु नगर, कारेगाव रोड, परभणी येथे भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
उत्सवाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते १० या वेळेत “श्री गजानन विजय” ग्रंथाचे पारायण तसेच ऋग्वेद संहिता पारायण होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता श्री विष्णुसहस्त्रनाम पाठ तर रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी “श्री गजानन विजय” पारायण, ऋग्वेद संहिता पारायण, ‘श्री’ पंचसुक्त व पवमान अभिषेक होणार आहे. यानंतर सकाळी १०.३० ते १.०० या वेळेत काला कीर्तन ह.भ.प. श्री शंकर आजेगावकर यांचे होईल. दुपारी १.३० ते ५.३० या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला असून, रात्री ८ वाजता ओंकार भजनी मंडळाचे भजन होणार आहे.
या कार्यक्रमांचे आयोजन ह.भ.प. माधवराव आजेगावकर (आत्मोन्नती प्रतिष्ठान, परभणी) व सौ. गिरीजा शंकरराव आजेगावकर (सदस्य, मनपा, परभणी) यांच्या वतीने करण्यात आले असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis