


रायगड, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खालापूर पोलीस ठाणे हद्दीत कडक आणि व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, दबाव तंत्र, गोंधळ किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा
- उपविभागीय पोलीस अधिकारी - विशाल नेऊलॉ
- खालापूर पोलीस ठाणे – पोलीस निरीक्षक : सचिन पवार
- खोपोली पोलीस ठाणे – पोलीस निरीक्षक : सचिन हिरे
संवेदनशील मतदान केंद्रे, राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच वर्दळीच्या परिसरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिवस-रात्र वाढीव गस्त, नाकाबंदी, वाहन तपासणी व संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन, विनापरवाना प्रचार साहित्य, बेकायदेशीर दारू विक्री, पैशांचा गैरवापर, अफवा पसरविणे किंवा मतदारांवर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारात सहभागी आढळणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी शांतता राखून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी व प्रशासनास सहकार्य करावे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ खालापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे कडक आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके