
परभणी, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रीय समाज पक्षाने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. या अनपेक्षित पण महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडी घडत असताना राष्ट्रीय समाज पक्षाने पाथरीमतदारसंघातील शिवसेनेच्या सहा उमेदवारांना पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशाने व शिवसेना नेते सईद खान यांच्या पुढाकाराने पाठिंबा दिला. यात पाथरी तालुक्यातील देवनांद्रा सर्कलच्या सुमनबाई चक्रघर उगले, हादगाव सर्कलच्या शकुंतला भागवत फासाटे, कासापुरी सर्कलचे रंगनाथ वाकणकर, मानवत तालुक्यातील कोल्हा सर्कलचे गंगाधर पितळे, परभणी तालुक्यातील लोहगाव सर्कलचे विनोद लोहगावकर, पोखर्णी (नृ.) सर्कलच्या बायनाबाई लोखंडे या उमेदवारांचा समावेश आहे.
रासपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य
ज्ञानोबा ताटे यांनी शिवसेना नेते सईद खान यांच्या उपस्थितीत प्रत्येक उमेदवारांना पाठींब्याचे पत्र दिले. राष्ट्रीय समाज पक्षाचा ग्रामीण भागात असलेला प्रभाव, विशेषतः शेतकरी, ओबीसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यकर्त्यांची मजबूत बांधणी लक्षात घेता, या पाठिंब्याचा शिवसेनेला थेट फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis