अमरावतीत अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनाचे उद्घाटन
अमरावती, 08 फेब्रुवारी (हिं.स.)गज़ल ही हृदयाची धडधड जिवंत ठेवणारी विधा आहे. आज उदंड प्रमाणावर मराठी गज़ल लिहिली जात असून रोज नवनव्या शक्यतांचे प्रदेश खुले होत आहेत. अमरावती येथे होणारे तिसरे अखिल भारतीय ‘एल्गार’ मराठी गज़ल संमेलन हे मराठी गज़लच्या प्रव
गज़ल हृदयाची धडधड जिवंत ठेवते : वैभव जोशी अ. भा. मराठी गज़ल संमेलनाचे उद्घाटन


अमरावती, 08 फेब्रुवारी (हिं.स.)गज़ल ही हृदयाची धडधड जिवंत ठेवणारी विधा आहे. आज उदंड प्रमाणावर मराठी गज़ल लिहिली जात असून रोज नवनव्या शक्यतांचे प्रदेश खुले होत आहेत. अमरावती येथे होणारे तिसरे अखिल भारतीय ‘एल्गार’ मराठी गज़ल संमेलन हे मराठी गज़लच्या प्रवासातले महत्त्वाचे आणि दखलपात्र वळण ठरणार आहे. गज़लचे भवितव्य उज्वल असल्याने गज़लकारांची जबाबदारी देखील वाढते. लिहिणार्‍यांनी गज़लकारापेक्षा आपल्यातला वाचक आणि आस्वादक टिकून ठेवावा, असे आवाहन तिसर्‍या अखिल भारतीय एल्गार मराठी गज़ल संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात गज़लकार वैभव जोशी यांनी केले.

स्व. सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान आणि वसंतराव पालेकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय संमेलनाला शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे थाटात प्रारंभ झाला. मंचावर संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ शाहीर सुरेशकुमार वैराळकर, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नाना लोडम यांच्यासह विशेष अतिथी म्हणून उर्दू शायर ओबेद आजम आजमी, डॉ. गणेश गायकवाड, ओमप्रकाश चर्जन, गज़लकार नितीन देशमुख आणि दुसर्‍या एल्गार गज़ल संमेलनाचे स्वागताध्यक्ष दगडू लोमटे उपस्थित होते.

उद्घाटकीय भाषणात बोलताना शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी मराठी गज़ल समृद्ध होती, आहे आणि भविष्यात होत राहील, असे मत मांडले. डॉ. पांढरपट्टे यांनी देशभरात अनेक गज़लकार सकस मराठी गज़ल लिहित आहेत, हे सुरेश भट यांचे ऋण असून त्यातून उतराई होणे शक्य नाही, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकातून नाना लोडम यांनी संमेलनाच्या आयोजनाची भूमिका विषद केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशांत वैद्य यांना अंबाजोगाई येथील साधना सेवाभावी संस्थेचा दगडू लोमटेद्वारा दिला जाणारा गज़ल साधना २०२६ हा पुरस्कार तर कुणाल शिरोडे आणि श्वेता बरकडे यांना ‘गज़लांकुर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काही मराठी गज़लसंग्रहांचे विमोचनही मान्यवरांनी केले. देशभरातून आलेले शेकडो गज़लकार, शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत विभूती, गज़लप्रेमी तसेच साहित्यिक या सोहळ्याचे साक्षीदार झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande