
अमरावती, 08 फेब्रुवारी (हिं.स.)अमरावती महापालिकेत महापौर व उपमहापौरांची निवडणूक शुक्रवार, दि. ६ रोजी पार पडली असून, त्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक व स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील सत्तासमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रक्रियेमुळे राजकीय नेत्यांची धावपळ पुन्हा एकदा वाढली आहे. पराभूत उमेदवारांसह इच्छुक नगरसेवकांनी नेत्यांकडे लॉबिंग सुरू केल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
महापालिकेत एकूण ८७ निवडून आलेले नगरसेवक आहेत. नगरविकास विभागाने २०२३ मध्ये केलेल्या नियमबदलानुसार आता एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्क्यांनुसार स्वीकृत नगरसेवक नामनिर्देशित करता येणार आहेत. त्यानुसार अमरावती महापालिकेत ८ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून स्वीकृत सदस्यपदासाठी सर्वाधिक इच्छुक असल्याची माहिती असून, या पदासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.
येत्या आठवड्यात स्वीकृत नगरसेवक तसेच स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. स्थायी समिती ही महापालिकेतील आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेणारी सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते. त्यामुळे या समितीत स्थान मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. गट नोंदणीनुसार पाच नगरसेवकांमागे एका स्थायी समिती सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे. विद्यमान पक्षीय बलानुसार भाजपचे ५, युवा स्वाभिमानचे ३, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे २ सदस्य स्थायी समितीत जाण्याची शक्यता आहे. १६ व्या सदस्यासाठी बसप व शिंदेसेना यांच्यात ईश्वरचिठ्ठीद्वारे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धवसेना (२) आणि वंचित बहुजन आघाडी (१) यांची स्वतंत्र गट नोंदणी झालेली आहे.
महापौर श्रीचंद तेजवानी हे स्थायी समिती सदस्यांची नावे अधिकृतरीत्या घोषित करणार आहेत. विशेष म्हणजे, महापौर व उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने भाजप व युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या निवडीतही राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार असून, आगामी काही दिवस महापालिकेच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी