डलासमधील वाढत्या इस्लामीकरणावर अमेरिकन खासदाराने व्यक्त केली चिंता
वॉशिंग्टन , 08 फेब्रुवारी (हिं.स.)।अमेरिकेतील टेक्सास राज्याचे रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल यांनी डलास शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात होत असलेल्या कथित ‘इस्लामीकरणा’बाबत चिंता व्यक्त केली आहे. काही भागांतील परिस्थिती अशी झाली आहे की तेथे गेल्यान
डलासमधील वाढत्या इस्लामीकरणावर अमेरिकन खासदाराने  व्यक्त केली चिंता


वॉशिंग्टन , 08 फेब्रुवारी (हिं.स.)।अमेरिकेतील टेक्सास राज्याचे रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल यांनी डलास शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात होत असलेल्या कथित ‘इस्लामीकरणा’बाबत चिंता व्यक्त केली आहे. काही भागांतील परिस्थिती अशी झाली आहे की तेथे गेल्यानंतर डलासमध्ये नसून जणू पाकिस्तानमध्ये आल्यासारखे वाटते, असे त्यांनी म्हटले आहे.

ब्रँडन गिल यांनी हे विधान एका मुलाखतीदरम्यान केले. त्यांनी सांगितले की त्यांच्या मतदारसंघातील अनेक नागरिक वारंवार याबाबत तक्रारी करत आहेत. रिपब्लिकन खासदारांच्या मते, त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मशिदी उभारल्या जात आहेत. यातील अनेक मशिदी अशा जमिनींवर किंवा त्यांच्या आसपास उभ्या राहत आहेत, ज्या पिढ्यान्‌पिढ्या स्थानिक अमेरिकन कुटुंबांच्या मालकीच्या आहेत. परिणामी, संपूर्ण समुदाय वेगाने बदलत असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “लोक मला सांगतात की जेव्हा ते आपल्या स्थानिक मॉलमध्ये जातात, तेव्हा आजूबाजूला पाहिल्यावर असे वाटते की आपण डलास, टेक्सासमध्ये नसून पाकिस्तानमध्ये आहोत.” ब्रँडन गिल यांनी सोशल मीडियावरही याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “मोठ्या प्रमाणावर होणारे इस्लामी स्थलांतर आपण ओळखत असलेले आणि प्रेम करत असलेले अमेरिका नष्ट करत आहे.”

ब्रँडन गिल हे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत टेक्सासच्या 26व्या काँग्रेस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2024 मध्ये निवडून आले आहेत. ते अमेरिकी प्रतिनिधी सभेतील न्यायपालिका, अर्थसंकल्प आणि देखरेख (निगराणी) समित्यांचे सदस्य आहेत. तसेच ते ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसी’ या उपसमितीचेही सदस्य असून, त्यांचा भर सीमा सुरक्षा, सरकारी खर्चात कपात आणि आर्थिक बळकटीकरण यावर आहे.

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची विधाने अमेरिकेत धार्मिक विविधता, स्थलांतर आणि सामाजिक बदलांबाबत सुरू असलेली चर्चा अधिक तीव्र करू शकतात. या वक्तव्यावर डेमोक्रॅटिक पक्ष तसेच मानवी हक्क संघटनांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande