
मुंबई, 10 मार्च (हिं.स.)। जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेऊ नयेत, तर संयम राखून शांतपणे परिस्थितीचा सामना करावा, असा सल्ला सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी दिला. भारतीय भांडवली बाजाराची अंतर्गत पायाभूत रचना मजबूत असल्यामुळे जागतिक धक्क्यांनाही भारतीय बाजारपेठ लवचिकपणे तोंड देऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय भांडवली बाजारातील महत्त्वाचा निर्देशांक असलेल्या निफ्टी-५० च्या ३० वर्षांच्या प्रवासाचा उत्सव नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) तर्फे मुंबईतील एक्स्चेंज प्लाझा येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात बाजारातील अग्रगण्य संस्था, निफ्टी-५० मधील कंपन्यांचे प्रतिनिधी, नियामक संस्था आणि भांडवली बाजाराशी संबंधित विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
आपल्या भाषणात पांडे यांनी सांगितले की, निफ्टी-५० च्या तीन दशकांचा प्रवास हा केवळ एका निर्देशांकाचा इतिहास नसून भारताच्या भांडवली बाजाराच्या आणि त्याला आधार देणाऱ्या संस्थात्मक रचनेच्या विकासाचा व्यापक प्रवास आहे. निफ्टी आज कॉर्पोरेट भारताचे प्रतिबिंब, गुंतवणूकदारांच्या भावनांचा निर्देशक आणि बाजाराच्या दिशेचा मार्गदर्शक म्हणून विकसित झाला आहे.
जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरता वाढत असताना अनेकदा गुंतवणूकदार भावनिक निर्णय घेतात. मात्र अशा परिस्थितीत घाबरण्यापेक्षा दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या ३० वर्षांत निफ्टीने अनेक जागतिक आर्थिक संकटे, बाजारातील चढउतार आणि विविध आर्थिक धक्के अनुभवले आहेत. तरीही दीर्घकालीन कालावधीत त्याने भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याची आणि विकासकथेची सातत्याने पुष्टी केली आहे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला आरबीआयचे स्वतंत्र संचालक आणि विचारवंत एस. गुरुमूर्ती, एनएसईचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी तसेच एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान उपस्थित होते.
एस. गुरुमूर्ती यांनी सांगितले की, भारताची वित्तीय प्रणाली गेल्या काही दशकांत मजबूत संस्थात्मक चौकटीमुळे अधिक सक्षम बनली आहे. नियामक देखरेख, पारदर्शकता आणि गुंतवणूकदार संरक्षण यांसारख्या घटकांमुळे भारतीय बाजारपेठांबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एनएसईचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी म्हणाले की, १९९० च्या दशकात आर्थिक उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला निफ्टी-५० निर्देशांक आज भारताच्या आर्थिक गतीचे एक शक्तिशाली प्रतीक बनला आहे. भारत ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करत असताना एनएसई आणि निफ्टी-५०सारखे पारदर्शक व विश्वासार्ह निर्देशांक देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत राहतील, असे त्यांनी सांगितले.
एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान यांनी सांगितले की, निफ्टी-५० हा केवळ शेअर बाजाराचा बेंचमार्क राहिलेला नाही, तर तो भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील गतिमानता आणि भांडवली बाजाराच्या वाढीचे प्रतीक बनला आहे. इंडेक्स फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) तसेच डेरिव्हेटिव्ह बाजाराच्या विकासातही निफ्टी-५०ने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
निफ्टी-५० निर्देशांकाची सुरुवात २२ एप्रिल १९९६ रोजी करण्यात आली असून त्याचा बेस डेट ३ नोव्हेंबर १९९५ आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध प्रमुख क्षेत्रांतील ५० मोठ्या आणि तरल कंपन्यांच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करणारा हा निर्देशांक आज भारतीय इक्विटी बाजाराचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे.
३ नोव्हेंबर १९९५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत निफ्टी-५० टोटल रिटर्न इंडेक्सने १२.७४ टक्के वार्षिक चक्रवाढ परतावा दिला आहे, तर प्राइस रिटर्न इंडेक्सने ११.२३ टक्के परतावा नोंदवला आहे. यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने भारतीय भांडवली बाजाराची क्षमता अधोरेखित होते.
या समारंभाच्या निमित्ताने ‘Nifty Panorama’ हे पुस्तक तसेच “Nifty 50: Thirty Years of India’s Market Evolution” हा श्वेतपत्रही प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांनी एनएसईची पारंपरिक घंटा वाजवून केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule