मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका; मुंबईत गॅस टंचाईमुळे २० टक्के हॉटेल्स बंद
मुंबई, 10 मार्च (हिं.स.)। मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातील दैनंदिन जीवनावरही दिसू लागला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील हॉटेल उद्योगासमोर गंभीर परिस्थिती उभी राहिली
hotels closed due gas shortage Mumbai


मुंबई, 10 मार्च (हिं.स.)। मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातील दैनंदिन जीवनावरही दिसू लागला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील हॉटेल उद्योगासमोर गंभीर परिस्थिती उभी राहिली आहे. गॅसच्या कमतरतेमुळे मुंबईतील सुमारे २० टक्के हॉटेल्स बंद झाली असल्याची माहिती हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या ‘आहार’ असोसिएशनने दिली आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही तर पुढील दोन दिवसांत शहरातील सुमारे ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मध्य पूर्वेतील युद्धामुळे द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) आणि एलपीजीच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. ‘आहार’ असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे अनेक हॉटेल्सना आपले कामकाज बंद ठेवावे लागले आहे. मात्र, हॉटेल्स बंद करण्याचा कोणताही अधिकृत सामूहिक निर्णय संघटनेने घेतलेला नाही. प्रत्येक हॉटेल मालक आपल्या उपलब्ध साठ्यानुसार हॉटेल चालू ठेवायचे की बंद करायचे याचा निर्णय घेत आहे.

मुंबईप्रमाणेच चेन्नईमध्येही एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. चेन्नई हॉटेल असोसिएशनने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा तात्पुरता थांबवल्याने रेस्टॉरंट्स आणि अन्नाशी संबंधित व्यवसायांवर गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अन्न उद्योग हा २४ तास चालणारा व्यवसाय असून रुग्णालये, आयटी पार्क, महाविद्यालयीन वसतिगृहे आणि प्रवाशांसाठी हॉटेल्स अन्नपुरवठ्याचे महत्त्वाचे केंद्र आहेत. त्यामुळे सिलिंडरचा पुरवठा बंद राहिल्यास या सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता असोसिएशनने व्यक्त केली आहे.

चेन्नई हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष एम. रवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या हॉटेल्सकडे केवळ दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध आहे. जर लवकरच पुरवठा सुरळीत झाला नाही तर अनेक हॉटेल्सना सेवा बंद करावी लागू शकते. दरम्यान, गॅस टंचाईच्या मुद्द्यावर ‘आहार’ संघटना केंद्र सरकारशी तसेच राज्य सरकारशी संपर्क साधत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा सुरू असून मंगळवारी संघटनेचे प्रतिनिधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करणार आहेत.

गॅस टंचाईचा फटका केवळ हॉटेल उद्योगालाच बसलेला नाही, तर उद्योग क्षेत्रालाही त्याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक वसाहतींमध्ये एलएनजीच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योगांचे उत्पादन ठप्प झाले आहे. कतारमधील एलएनजी उत्पादनावर परिणाम झाल्याने भारताला होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी छत्रपती संभाजीनगरमधील किमान पाच मोठ्या उद्योगांचे उत्पादन बंद पडले असून आणखी उद्योग बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी परिसरातील उद्योगांना दररोज सुमारे २५० ते ३०० मेट्रिक टन एलएनजीची गरज असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत पुरेसा गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टील उद्योगांनाही फटका बसत आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हॉटेल बंद झालीत, अशी उदाहरणं आमच्यासमोर आली नाहीत. घरगुती गॅस पुरवठ्यावर सध्या कोणतीही अडचण नाही. कमर्शियल गॅसच्या संदर्भात केंद्र सरकारने काही निर्णय घेतले असून त्यानुसार राज्य सरकार कार्यवाही करत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी काही दिवसांत परिस्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्रीही या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, देशभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आखाती देशांतील युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि जनतेच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार आहे याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट माहिती देशासमोर मांडावी, अशी मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत गॅस पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर देशातील हॉटेल उद्योग आणि अनेक उद्योगधंद्यांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande