
अमरावती, 11 मार्च (हिं.स.)
विद्यार्थी हिताच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेत प्रचंड घोषणाबाजी करून प्रवेश करत एक प्रकारे सभेचा ताबा घेतला. झालेल्या प्रचंड गोंधळात कुलगुरूंनी सभा तहकूब करून अभावीपने विद्यार्थी प्रश्नावर उत्तर देण्यासाठी त्यांना बाध्य केले.
काही महिन्यापूर्वी अभावीपने विद्यापीठावर आणलेल्या मोर्चादरम्यान विविध मागण्यांचे जे निवेदन दिले होते. त्यावर विद्यापीठाकडून काहीच कारवाई न झाल्याचा संताप आंदोलकांनी सभागृहात व्यक्त केला. विद्यार्थी हिताचे जे प्रश्न आम्ही उपस्थित केले त्या प्रश्नावर आमचे समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहातून बाहेर पडणार नाही अशी भूमिका अभावीपने घेतली. शेवटी कुलगुरूंनी आंदोलकांना प्रश्न मांडण्याची मुभा दिली. त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न कुलगुरूंनी केला. मागण्यावर आवश्यक कारवाई तातडीने करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अभावीप कार्यकर्त्यांनी नारेबाजी करून सभागृह सोडले. अभावीप राष्ट्रीय मंत्री पायल किनाके, प्रदेश मंत्री देवाशिष गोतरकर, विभाग संघटन मंत्री योगेश शेळके यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी