नाशिकमध्ये गुरुवारपासून ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन
नाशिक, 11 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी १२ ते १६ मार्च २०२६ दरम्यान ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन यूथ फेस्टिवल मैदान (बळी मंदिर चौक, पार्क साईट शेजारी), नाशिक येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्
Agricultural Kumbh' exhibition to


नाशिक, 11 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी १२ ते १६ मार्च २०२६ दरम्यान ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन यूथ फेस्टिवल मैदान (बळी मंदिर चौक, पार्क साईट शेजारी), नाशिक येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने व आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद उपस्थित होते.

या प्रदर्शनात आधुनिक शेतीतील नवकल्पना, कृषी यांत्रिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योग, शासकीय योजना तसेच कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार असून उत्पादन व उत्पन्नवाढ हा मुख्य उद्देश आहे.

१२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मेघा संजीव बोरसे, विमल जगन आचारी, सुनीता राजाभाऊ खेमनार, श्रद्धा सुनील कासुर्डे, संगीता वाल्मीक सांगळे, पूनम निवृत्ती डोखळे व लक्ष्मी मधुकर मोरे या पुरस्कारप्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर व सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञान, ड्रोन, स्मार्ट सेन्सर, इलेक्ट्रिक बुल, कांदा चाळीसाठी सेन्सर यांसह ३० एआय स्टॉल्स तसेच ३० पेक्षा अधिक कृषी यंत्रसामग्री स्टॉल्स असतील. निविष्ठा, अन्नप्रक्रिया, मशिनरी, बँकिंग व महिला बचत गटांच्या उत्पादनांचीही दालने असणार आहेत.

१२ व १३ मार्च रोजी ‘जुगाड ते तंत्रज्ञान’ स्पर्धा तर १३ ते १६ मार्च दरम्यान पंकज नाठे, अनंत मोरे, तुकाराम निकम, सोमनाथ गांगुर्डे, डॉ. राजीव काळे व डॉ. तुषार आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवाद होणार आहेत. दररोज २५ प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रदर्शनात ग्रेप कव्हर, बायोचार, ‘१० ड्रम’ नैसर्गिक शेती मॉडेल, बायोफ्लॉक व ठिबक ऑटोमायझेशनची प्रात्यक्षिके होणार आहेत. १४ मार्च रोजी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ व १५ मार्च रोजी ‘फोकलोक’ सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून ‘खाऊ गल्ली’त पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध असतील.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधून शेतकऱ्यांना आणण्यासाठी १ हजार ३८६ बसचे नियोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande