‘महाबीज’तर्फे सामाजिक उत्तरदायित्व, निधीतून १० शाळांना ग्रंथसाहित्य भेट!
अकोला, 11 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० शाळांना ग्रंथालयांसाठी विविध विषयांची पुस्तके आणि दर्जेदार कपाट अशा वाचन साहित्याचे वितरण जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या
Photo


अकोला, 11 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० शाळांना ग्रंथालयांसाठी विविध विषयांची पुस्तके आणि दर्जेदार कपाट अशा वाचन साहित्याचे वितरण जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आले.

महाबीजभवनात हा कार्यक्रम झाला. महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजीत सपकाळ, उपजिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक प्रशासन डॉ. संजय गरकल, कंपनी सेक्रेटरी विनय वर्मा, डॉ. जितेंद्र काठोळे यांच्यासह महामंडळाचे सर्व विभागप्रमुख आणि संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

डिजीटल युगात विद्यार्थ्यांचा कल स्क्रीनकडे वाढत असताना त्यांना पुन्हा पुस्तकांकडे वळवणे काळाची गरज आहे. या ग्रंथालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होईल व त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी केले.

गुणवत्ता वाढीसाठी पुस्तकांचे महत्त्व

महाबीजच्या संचालकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची वाचन क्षमता विकसित करणे आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा आहे. केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके न वाचता अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यांची कल्पनाशक्ती विस्तारते. या पुस्तकांचा उपयोग शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रभावीपणे करावा, अशी अपेक्षाही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

`निवडक शाळांची निवड`

जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये वाचन साहित्याची कमतरता होती, अशा जिल्हा परिषदेच्या १० शाळांची या उपक्रमासाठी विशेष निवड करण्यात आली. वितरीत करण्यात आलेल्या वाचन साहित्यामध्ये कथा, कादंबरी, सामान्य ज्ञान, थोर पुरुषांची चरित्रे आणि स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे. महाबीजच्या या स्तुत्य उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जितेंद्र काठोळे आणि आभार विनय वर्मा यांनी मानले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande