
नांदेड, 11 मार्च (हिं.स.) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ने 'ऑपरेशन यात्री सुरक्षा', 'ऑपरेशन रेल सुरक्षा' आणि 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रभावी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करणे या बाबतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 'ऑपरेशन यात्री सुरक्षा' अंतर्गत गाडी क्रमांक १७६३० नांदेड-हडपसर एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेचा आरपीएफ, जीआरपी आणि सीआयबी पथकाने संयुक्त कारवाईत यशस्वी उलगडा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळ अटक करण्यात आली.
त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे १७.५७ग्रॅम वजनाची अंदाजे ४३,७०० रुपये किंमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी ती सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. पिंगळी रेल्वे स्थानकाजवळ आरपीएफ व जीआरपीच्या संयुक्त पथकाने रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले.
या कारवाईदरम्यान चार मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि तीन धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे १.८० लाख रुपये आहे. आरोपींना जीआरपी नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. संबंधित आरोपीला जीआरपी परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. 'ऑपरेशन रेल सुरक्षा' अंतर्गत अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे सिग्नलिंग केबल चोरीची घटना टळली. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ जवळ सिग्नलिंग केबल कापत असताना दोन व्यक्तींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे १० मीटर सिग्नलिंग केबल तसेच गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली. आरोपींना रेल्वे संपत्ती (बेकायदेशीर ताबा) अधिनियमांतर्गत अटक करण्यात आली आहे. दरम्यान, 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी कर्मचा-यांनी घरातून पळून जाऊन रेल्वेत चढलेल्या १७ वर्षीय मुलाची सुटका केली. समुपदेशनानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन सुरक्षितपणे करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis