
सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)मंगळवेढा तालुक्यातील रमाई आवास, मोदी आवास आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे बँक खाते बदलामुळे प्रलंबित असलेले अनुदान येत्या दोन ते तीन दिवसांत अदा करण्यात येईल. तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आधारबेस्ड प्रणालीद्वारे देण्याबाबत विचार केला जाईल, असे उत्तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.या योजनांतील सुमारे ३०० लाभार्थ्यांचे बँक खाते बदलल्यामुळे त्यांना अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे अनेक लाभार्थी आर्थिक अडचणीत आले होते.
आमदार समाधान आवताडे यांनी हा प्रश्न लक्षवेधीद्वारे विधानसभेत उपस्थित केला. घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देणे, ज्या लाभार्थ्यांकडे घरासाठी जागा नाही त्यांना जागा उपलब्ध करून देणे, तसेच वाळूऐवजी रोख अनुदान देण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांनी घरकुलासंदर्भातील प्रश्न मुद्देसूद मांडले. सभापती राहुल नार्वेकर यांनीही घरकुलासंबंधी किती प्रश्न आहेत, अशी विचारणा केली. या विषयावर पुन्हा बोलण्याची संधी देणार का, असा प्रश्नही आवताडे यांनी यावेळी उपस्थित केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड