कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाला उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न
सत्यजित जाधवांनी घेतला विभागाचा सविस्तर आढावा केएमटी बससेवा विस्ताराचा सोडला संकल्प कोल्हापूर, 12 मार्च (हिं.स.) : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ कामाला सुरुवा
परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची आढावा बैठक


सत्यजित जाधवांनी घेतला विभागाचा सविस्तर आढावा

केएमटी बससेवा विस्ताराचा सोडला संकल्प

कोल्हापूर, 12 मार्च (हिं.स.) : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत परिवहन विभागाचा सविस्तर आढावा घेतला. परिवहन विभागाला उर्जितावस्था देत केएमटी सेवा अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभापतीपदी निवड झाल्यानंतर जाधव यांनी परिवहन कार्यालयाला भेट देऊन विभागातील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, ट्रॅफिक अधिकारी नितीन पोवार, लेखा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी, खरेदी अधिकारी संजय जाधव, आस्थापन व्यवस्थापक बानू साबळे, वर्कशॉप इन्चार्ज आर. आर. मोरे, तसेच प्रदीप मेहत्तर, दिनेश सोमण, संतोष लोखंडे आदी अधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.यावेळी जाधव यांनी सांगितले की, हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरात केएमटी बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच केएमटी विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा बैठक घेण्यात येईल.

केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या १०० एसी बसांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असून, केएमटीचा ताफा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बसांनी सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बससेवा वापरावी यासाठी बसस्थानके स्वच्छ ठेवणे, सेवा दर्जेदार करणे आणि केएमटीचा कारभार अधिक सक्षम करणे यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या केएमटी कामगारांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. चालक व वाहकांचा विमा उतरविण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सभापती जाधव यांनी दिले.

यानंतर जाधव यांनी शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपला भेट देऊन स्टोअर, ऑइल, असेंबली, डिझेल विभागासह विविध विभागांची पाहणी केली. यावेळी वर्कशॉपचे सुपरवायझर जगदीश शेंडगे, मोरे, तसेच केएमटी मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते नूतन सभापती सत्यजित जाधव यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेचा परिवहन विभाग सक्षम व स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे, असे आवाहन सभापती सत्यजित जाधव यांनी केले.

----------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande