कर्जत पंसवर परिवर्तन आघाडीचा झेंडा; सभापतीपदी नमिता घारे, उपसभापतीपदी चित्रा ठाकरे बिनविरोध
रायगड, 12 मार्च (हिं.स.)। कर्जत पंचायत समितीच्या सत्तेवर परिवर्तन विकास आघाडीने जोरदार झेंडा रोवला असून सभापतीपदी नमिता सुधाकर घारे तर उपसभापतीपदी चित्रा जगदीश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडीमु
Namita Ghare as the Chairperson


रायगड, 12 मार्च (हिं.स.)। कर्जत पंचायत समितीच्या सत्तेवर परिवर्तन विकास आघाडीने जोरदार झेंडा रोवला असून सभापतीपदी नमिता सुधाकर घारे तर उपसभापतीपदी चित्रा जगदीश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडीमुळे पंचायत समितीत नव्या राजकीय समीकरणांना वेग आल्याचे चित्र दिसत आहे.

कर्जत पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीसाठी तहसीलदार धनंजय जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी त्यांना सहकार्य केले.

काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीने दमदार कामगिरी करत जिल्हा परिषद गटाच्या सहापैकी सहा जागा आणि पंचायत समितीच्या १२ पैकी तब्बल १० जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे सभापती व उपसभापती पदावर परिवर्तन आघाडीचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले होते.

सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता सुधाकर घारे तर उपसभापती पदासाठी शिवसेना (ठाकरे गट)च्या चित्रा जगदीश ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांनी नमिता घारे यांची सभापतीपदी आणि चित्रा ठाकरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सभापती व उपसभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, अशोक भोपतराव, बंडू पाटील, भगवान भोईर, सुनील पाटील, रंजना धुळे, नगराध्यक्ष पुष्पा दगडे, पूजा सुर्वे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनगराध्यक्ष संतोष पाटील, रसिका नितीन सावंत, सुवर्णा जोशी यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जत पंचायत समितीत नव्या नेतृत्वाच्या निवडीमुळे तालुक्यातील राजकारणात पुढील काळात कोणते नवे निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande