करवीर तालुक्यातील नंदवाळ तीर्थक्षेत्रासाठी जागा देण्यासंदर्भात लवकरच बैठक - गृहराज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, 12 मार्च (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिर हे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रासाठी जागा देण्यास राज्य शासन सकारात्मक आहे. मात्र, या तीर्थक्षेत्रासाठी किती एकर जागा लागेल व भारत बटालियनच्या प्रक
करवीर तालुक्यातील नंदवाळ तीर्थक्षेत्रासाठी जागा देण्यासंदर्भात लवकरच बैठक - गृहराज्यमंत्री योगेश कदम


मुंबई, 12 मार्च (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिर हे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रासाठी जागा देण्यास राज्य शासन सकारात्मक आहे. मात्र, या तीर्थक्षेत्रासाठी किती एकर जागा लागेल व भारत बटालियनच्या प्रकल्पासाठी किती जागा लागेल यासंदर्भात बैठक आयोजित करून निर्णय घेऊ, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिराच्या गोल रिंगण सोहळ्यासाठी जागा राखीव करणे व त्या जागेवर रिंगण सोहळ्यास भारत बटालियनकडून होणारा विरोध यासंदर्भात सदस्य चंद्रदीप नरके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम उत्तर देत होते.

गृहराज्यमंत्री कदम म्हणाले की, २०२३ मध्ये या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या बैठकीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महसूल विभागामार्फत आणि महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून येथे भारत बटालियनसाठी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ग्रामस्थांनी त्यापैकी ५० एकर जागा देवस्थान आणि तीर्थक्षेत्रासाठी देण्याची मागणी केली आहे. पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या अहवालानुसार ५० एकर जागा दिल्यास प्रस्तावित प्रकल्प पूर्ण क्षमतेने उभारणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, त्यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांना सुमारे १० एकर जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

नंदवाळ परिसरातील देवस्थान आणि तीर्थक्षेत्राला मोठे धार्मिक महत्त्व असून आषाढी वारीच्या काळात येथे लाखो भाविक येतात तसेच रिंगण सोहळाही येथे पार पडतो. तीर्थक्षेत्रासाठी नेमकी किती जागा आवश्यक आहे, याचा आढावा घेण्यासाठी लवकरच संबंधित विभाग आणि ग्रामस्थांची बैठक घेण्यात येणार आहे. धार्मिकस्थळाच्या गरजा आणि भारत बटालियनच्या प्रकल्पाचे उद्दिष्ट या दोन्ही गोष्टी साध्य होतील, अशा पद्धतीने निर्णय घेण्यात येईल, असेही राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande