वेळापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम
सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)।११ मार्च २०२६ रोजी इंद्रनील मंगल कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत परिवर्तन लोकसंचालित साधना केंद्र वेळापूर यांच्या वतीने महिलांसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक
वेळापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम


सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)।११ मार्च २०२६ रोजी इंद्रनील मंगल कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत परिवर्तन लोकसंचालित साधना केंद्र वेळापूर यांच्या वतीने महिलांसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात महिला बचत गटातील भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमास माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. विमलताई जानकर (पंचायत समिती सदस्य माळशिरस), जि.प. सदस्य मीनाक्षीताई मिलिंद सरतापे (वेळापूर), सरपंच रजनीश बनसोडे, डॉ. स्नेहलताई जानकर (ग्रामपंचायत सदस्य वेळापूर), माळशिरस तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने महिला बचत गटातील महिला भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. महिलांच्या शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक योगदानाची जाणीव या प्रसंगी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली इंगोले-देशमुख यांनी केले. त्यांनी महिला बचत गटांचा गेल्या अनेक वर्षांतील प्रवास, ग्रामीण महिलांनी संघर्षातून उभा केलेला स्वावलंबी मार्ग आणि महिलांच्या एकजुटीची ताकद याविषयी माहिती दिली. महिला बचत गट हे केवळ आर्थिक सक्षमीकरणाचे साधन नसून सामाजिक परिवर्तन घडवणारी चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. स्नेहलताई जानकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न, मूलभूत पायाभूत सुविधा, तसेच महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत योग्य आहार, स्वच्छता आणि नियमित आरोग्य तपासणी याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन कुटुंब व समाजाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

सरपंच रजनीश बनसोडे आणि तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव यांनीही महिलांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना, महिला बचत गटांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि ग्रामीण विकासातील महिलांची भूमिका यावर माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वेळापूरचे निवेदक रणजीत सरवदे यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यानंतर महिलांसाठी “खेळ पैठणीचा” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लातूर येथील प्रसिद्ध निवेदक सचिन उपाध्ये व त्यांच्या टीमने विविध खेळ, विनोदी संवाद आणि मनोरंजनात्मक सादरीकरणातून उपस्थित महिलांचे मनमुराद मनोरंजन केले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

मोठ्या आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी अजित बनसोडे यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, आयोजक आणि महिला भगिनींचे आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande