
दागिन्यांच्या व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीची दखल
नाशिक, 12 मार्च (हिं.स.) : मालाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ पुरस्कार सोहळ्यात ‘बिझनेस भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दागिन्यांच्या रिटेल विक्री क्षेत्रात दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाच्या जोरावर जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण बदल घडवून आणल्याबद्दल तसेच समाजासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील ऐतिहासिक गेट-वे ऑफ इंडिया येथे हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्यासह अनेक मंत्री, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित होत्या.हे पुरस्कार लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिले जातात. उद्योग, समाज आणि विविध क्षेत्रांत आपल्या कार्याने विशेष ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांद्वारे गौरविण्यात येते. एम. पी. अहमद यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासाचे प्रतीक मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मालाबार गोल्ड अँड डायमंड्स हे जगातील पाचव्या क्रमांकाचे आणि भारतीय मूळ असलेले सर्वात मोठे ज्वेलरी रिटेलर म्हणून उदयास आले आहे.
पुरस्कार स्वीकारताना एम. पी. अहमद यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात ‘बिझनेस भूषण’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान संपूर्ण मालाबार परिवाराच्या योगदानाचा आणि आमच्या ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाचा आहे. जबाबदारी, सचोटी आणि सर्व हितधारकांच्या प्रगतीवर आमचा व्यवसाय आधारित आहे. समाजासाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
महाराष्ट्र राज्य मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह राज्यभरात कंपनीची 34 शोरूम्स कार्यरत आहेत. या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली असून संघटित ज्वेलरी रिटेल क्षेत्र अधिक मजबूत झाले आहे. तसेच ग्राहकांना जागतिक दर्जाच्या डिझाइन्स आणि सेवा उपलब्ध होत आहेत.
यापुढेही विस्ताराचा वेग कायम ठेवत 2029 पर्यंत महाराष्ट्रातील शोरूम्सची संख्या 64 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट मालाबार ग्रुपने निश्चित केले आहे
.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis