पश्चिम आशियातील तणावामुळे शेअर बाजारात घसरण
सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडले मुंबई, 12 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. गुरुवारी सकाळी बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. गुंतवणूकदारांच
शेअर बाजार लोगो


सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडले

मुंबई, 12 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. गुरुवारी सकाळी बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. गुंतवणूकदारांच्या भावनांवर जागतिक घडामोडींचा दबाव पडल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल निशाणावर उघडले.

यापूर्वी बुधवारी 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स 1,342.27 अंकांनी घसरून 76,863.71 अंकांवर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 394.75 अंकांनी घसरून 23,866.85 अंकांवर बंद झाला होता. तर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 992.53 अंकांनी घसरून 75,871.18 अंकांवर पोहोचला. निफ्टीही 310.55 अंकांनी घसरून 23,556.30 अंकांवर आला. याशिवाय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 31 पैशांनी घसरून 92.32 वर पोहोचला.सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी इटरनल, इंटरग्लोब एव्हिएशन, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, टायटन आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. तर टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. दरम्यान, आशिया खंडातील इतर बाजारांमध्येही घसरण दिसून आली. टोकियोचा निक्केई 225 निर्देशांक 1.5 टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 1 टक्क्यांनी खाली आला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरला, तर शांघाय कंपोझिट निर्देशांक 0.5 टक्क्यांनी कमी झाला. ऑस्ट्रेलियाचा एसअँडपी/एएसएक्स 200 निर्देशांकही 1.6 टक्क्यांनी खाली आला.

पश्चिम आशियातील तणाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी जागतिक मानक ब्रेंट क्रूडची किंमत 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली. काही दिवसांपूर्वी ही किंमत जवळपास 120 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाण्याच्या स्थितीत होती.हॉर्मुज जलडमरूमध्याजवळ व्यावसायिक जहाजांवर इराणकडून हल्ले झाल्याच्या बातम्यांनंतर तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आणि किमतींमध्ये 9 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अमेरिकन मानक डब्ल्यूटीआय क्रूडची किंमतही वाढून जवळपास 95 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली.

बाजारातील आकडेवारीनुसार, बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 6,267.31 कोटी रुपयांचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 4,965.53 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande