
पुणे, 12 मार्च (हिं.स.)मागील पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर थेट राज्य शासनाकडून टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांची तक्रार थेट महापालिकेकडे यावी, या उद्देशाने पीएमसी रोड मित्र हे मोबाइल ऍप सुरू केले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच हे ऍप बंद पडले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, तसेच पथ विभागासही हे अॅप बंद असल्याची कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे शहरातील खड्डे आणि रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते १२ ऑगस्ट २०२५ रोजी या ऍपचे अनावरण करण्यात आले होते. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढून ऍपवर अपलोड केल्यास ते थेट पथ विभागाकडे पोहोचतील आणि ७२ तासांत खड्डे बुजवले जातील, असा दावा त्या वेळी प्रशासनाने केला होता. खड्डा बुजविण्याची जबाबदारी संबंधित उपअभियंत्यावर निश्चित केली जाईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वी व नंतरचे फोटो अपलोड करून तक्रार बंद केली जाईल, अशीही व्यवस्था या ऍपमध्ये केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु