
मुंबई, 12 मार्च (हिं.स.)।महाराष्ट्र विधानसभेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आज, गुरुवारी विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला. त्यानंतर सर्वांना गेटवरच रोखण्यात आलं असून संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ई-मेल पाठवणाऱ्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही आणि आरोपी अज्ञात आहे.
माहितीनुसार, सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी सीपीएच्या मेल वर हा धमकीचा ईमेल आलाय. धमकीची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने विधान भवन परिसर रिकामा केला. तत्काळ डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून सध्या संपूर्ण परिसराची सखोल तपासणी सुरू आहे. विधानभवानसोबत आणखी 4 ठिकाणी धमकी देण्यात आली. यासाठी सुरक्षा आणि तपास अधिकारी तपासणी करत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे परिसरात अनेक आमदार, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून पोलीस परिसरातील प्रत्येक भागाची कसून तपासणी करत आहेत. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
विधान भवनातील सर्व प्रवेश आणि निर्गमन दरवाजे बंद करण्यात आले असून कोणालाही आत किंवा बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सर्वसामान्य नागरिक तसेच माध्यम प्रतिनिधींनाही प्रवेश बंद करण्यात आला आहे. शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत परिसरातील सुरक्षा कडक ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांची सायबर सेल धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. ज्या ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली, त्याचा मागोवा घेऊन आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बॉम्ब डिस्पोसल आणि डिटेक्शन स्कॉड आणि डॉग स्कॉडकडून तपासणी सुरु असून अधिकची माहिती घेईन, लवकर उघड करणे योग्य ठरणार नाही. स्टॉक एक्सेचेंज, मेट्रो, हॉयकोर्ट आणि बॅंक या ठिकाणी धमकी देण्यात आलीय.यासाठी वेळही देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई सुरु आहे. सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी सीपीएच्या मेल वर एक ईमेल आलाय. यानंतर पोलिसांनी परवानगी घेऊन विधानभवनात प्रवेश केला. चौकशीतील माहिती जाहीर केली जाईल, असे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले.
दरम्यान, आतापर्यंतच्या तपासात परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. तरीही कोणतीही निष्काळजीपणा न करता संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे समाधानी झाल्यानंतरच परिसर सुरक्षित घोषित केला जाईल आणि त्यानंतरच ये-जा पुन्हा सुरू करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode