
बंगळुरू, 12 मार्च (हिं.स.)। ‘X-47’ या वाहनाच्या यशस्वी सादरीकरणानंतर, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी उत्पादने तयार करणाऱ्या Ultraviolette या भारतीय कंपनीने ‘बॅटरी फ्लेक्स’ (बीएएएस) ही नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे वाहन खरेदीसाठी एक वेगळा आणि लवचिक स्वरुपाचा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे. यातून देशभरातील ग्राहकांना अधिक सहज आणि परवडणाऱ्या दरात वाहन मिळू शकेल.
हवामानपूरक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्यासाठी ‘इकोफाय’ या विशेष वित्तपुरवठा करणाऱ्या बॅंकेतर वित्तकंपनीशी भागीदारी करून ‘Ultraviolette’ने आधुनिक वाहने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाचा विस्तार केला आहे. ‘बॅटरी फ्लेक्स’ योजनेमुळे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळेल आणि त्यांच्या खर्चातही बचत होईल. त्यामुळे शाश्वत स्वरुपाच्या वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होईल आणि वाहनांमधील नवकल्पनांच्या क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट होईल.
या उपक्रमामुळे ग्राहकांना आता ‘Ultraviolette X-47’ हे वाहन केवळ १,४९,००० रुपयांपासून खरेदी करता येईल. मात्र बॅटरीसाठी दरमहा २,४९९ रुपयांपासूनचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. या पद्धतीत ग्राहक बाइकचा मुख्य भाग (चॅसिस) खरेदी करतात, तर बॅटरीसाठी वेगळे मासिक शुल्क भरून त्यांना ती वापरता येते. त्यामुळे वाहन खरेदी करतानाचा सुरुवातीचा खर्च कमी होतो.
‘Ultraviolette’चे सीईओ व सहसंस्थापक नारायण सुब्रम्हण्यम या संदर्भात म्हणाले, “२.५ लाख रुपयांच्या किमतीत आमची मोटरसायकल समान क्षमतेच्या पेट्रोलवर चालणाऱ्या मोटरसायकलींशी स्पर्धा करत होती. आता सुरुवातीची किंमत १.५ लाख रुपये इतकी कमी झाल्यामुळे रायडर्सना अधिक चांगले तंत्रज्ञान, अधिक सुविधा आणि उत्तम परफॉर्मन्स कमी किंमतीत मिळणार आहे. ही गाडी चालविण्यासाठी दरमहा सुमारे २,४९९ रुपये इतका खर्च येतो. पेट्रोलच्या सरासरी खर्चापेक्षा तो कमी आहे. त्यामुळे मोटरसायकल परवडणारी असणे म्हणजे काय, याचीच नवी व्याख्या आम्ही करत आहोत. ‘बॅटरी फ्लेक्स’मुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेली, उत्तम कामगिरी करणारी वाहने भारतातील अधिकाधिक रायडर्ससाठी सहजपणे उपलब्ध होत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट कायम आहे, ती म्हणजे Ultraviolette चालवण्याचा रोमांचक अनुभव!”
‘बॅटरी फ्लेक्स’ योजनेमुळे वाहन खरेदीसाठी लागणारी सुरुवातीची गुंतवणूक सुमारे ४० टक्क्यांनी कमी होते. सबस्क्रिप्शनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बॅटरीची मालकी ग्राहकाकडे कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दिली जाते. या योजनेसाठीची नोंदणी दि. ५ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे. त्यामुळे भारतभरातील रायडर्सना कामगिरीच्या मुद्द्यावर तडजोड न करता आधुनिक वाहनाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
‘Ultraviolette’चे सीटीओ व सहसंस्थापक नीरज राजमोहन यांनी सांगितले, “प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनाच्या केंद्रस्थानी बॅटरी तंत्रज्ञान असते. उत्कृष्ट परफॉर्मन्स, सुरक्षितता आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता मिळावी यासाठी आम्ही अनेक वर्षे संशोधन आणि विकासावर भर दिला आहे. ‘बॅटरी फ्लेक्स’मुळे हे तंत्रज्ञान ग्राहकांपर्यंत अधिक लवचिक स्वरुपात सहजपणे उपलब्ध होईल अशा पद्धतीने पोहोचत आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित करणे आणि उच्च कार्यक्षमतेची वाहतूक व्यवस्था अधिक व्यवहार्य बनवणे, ही आमची भूमिका आहे.”
‘बॅटरी फ्लेक्स’च्या माध्यमातून Ultraviolette केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यास मदत करत नाही, तर परवडणारी किंमत, सोय आणि शाश्वतता याबाबतही नवे मापदंड निर्माण करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर