परभणीच्या कुपटा या गावी शनिवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला तसेच विद्यार्थ्यांपर्यंत शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि नागरिकांच्या प्रलंबित महसूल विषयक प्रकरणांचे जलद निवारण व्हावे या उद्देशाने ‘
परभणीच्या कुपटा या गावी शनिवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’


परभणी, 13 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला तसेच विद्यार्थ्यांपर्यंत शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि नागरिकांच्या प्रलंबित महसूल विषयक प्रकरणांचे जलद निवारण व्हावे या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सेलू तालुक्यात 14 मार्च रोजी विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाने दिली आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अनेकदा विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचे त्वरित निवारण व्हावे यासाठी महसूल प्रशासनामार्फत हे तीव्र स्वरूपाचे अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरांमधून महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या अभियानांतर्गत 14 मार्च 2026 रोजी कुपटा महसूल मंडळासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुपटा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित 12 पेक्षा अधिक सेवांचे निराकरण एकाच ठिकाणी करण्यात येणार असून नागरिकांना रहिवासी, उत्पन्न व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे मिळवणे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नवीन अर्ज स्वीकारणे, लँड सीडिंग करणे तसेच संबंधित तांत्रिक अडचणींचे निवारण करणे या सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच शिधापत्रिकेत नवीन नावे समाविष्ट करणे किंवा आवश्यक दुरुस्ती करणे, 7/12 उतार्यामध्ये वारस नोंद करणे व चुका दुरुस्त करणे, डिजिटल 7/12 संदर्भात मार्गदर्शन देणे, तुकडेबंदी कायद्यांतर्गत व्यवहारांचे नियमितीकरण करणे तसेच अकृषिक (एन.ए.) जमिनींसंदर्भातील प्रकरणांवर मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

तालुक्यातील संबंधित गावांमधील नागरिक व शेतकर्यांनी या शिबिराला उपस्थित राहून महसूल विभागाशी संबंधित आपली प्रकरणे व तक्रारी तात्काळ मार्गी लावून घ्यावीत आणि शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande