स्मार्ट मीटर बसविण्यावरून सेलूत नागरिकांचा संताप; कारवाई थांबवण्याची मागणी
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। सेलू शहरातील वीज ग्राहकांच्या घरांमध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीमार्फत नवीन स्मार्ट (डिजिटल) मीटर बसविण्याचे काम सुरू असून हे मीटर नागरिकांच्या संमतीशिवाय बळजबरीने बसविले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकाराविरोध
स्मार्ट मीटर बसविण्यावरून सेलूत नागरिकांचा संताप; कारवाई थांबवण्याची मागणी


परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। सेलू शहरातील वीज ग्राहकांच्या घरांमध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीमार्फत नवीन स्मार्ट (डिजिटल) मीटर बसविण्याचे काम सुरू असून हे मीटर नागरिकांच्या संमतीशिवाय बळजबरीने बसविले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकाराविरोधात संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन ही कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक वीज ग्राहकांना अनपेक्षितपणे जास्त वीज बिल येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, मजूर तसेच मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तसेच वीज बिल जास्त आल्यामुळे ते तत्काळ भरता न आल्यास संबंधित ग्राहकांचा वीज पुरवठा रिमोट प्रणालीद्वारे अचानक बंद केला जातो. बिल भरल्यानंतरही अनेकदा 10 ते 12 दिवसांनीच वीज पुरवठा पूर्ववत केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

एनसीसी कंपनीचे काम काही स्थानिक कंत्राटदारांमार्फत केले जात असून काही कंत्राटदार आर्थिक फायद्यासाठी नागरिकांवर दबाव टाकून मीटर बदलण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार कोणालाही स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करता येत नाही, असे असतानाही संबंधित कंपनीकडून आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सेलू शहरात बळजबरीने स्मार्ट मीटर बसविण्याची कारवाई तात्काळ थांबवावी, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना येणारे अवाजवी वीज बिल कमी करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, रिमोट पद्धतीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवावी तसेच संबंधित कंत्राटदारांच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

उपकार्यकारी अभियंता शंकरवार यांनी हे निवेदन स्वीकारले असून या निवेदनावर शेख रहीम शेख गुलाम, अशोक अंभोरे, कॉम्रेड रामकृष्ण शेरे, कॉम्रेड दत्तूसिंग ठाकूर, नगरसेवक विनोद धापसे, विठ्ठल कोकर, कॉम्रेड उद्धवराव पोळ, गौतम साळवे, रामेश्वर पौळ, अल्ताफ पठाण, फयाज खान जिलानी खान पठाण, दिलीप शेवाळे, सय्यद जावेद, सय्यद नियाजोद्दीन, राहुल लोखंडे, कॉम्रेड सुभाष शहाणे, शेख राजू आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.

दरम्यान, उपकार्यकारी अभियंता शंकरवार म्हणाले की, स्मार्ट मीटर बसविण्याबाबत वरिष्ठांकडून तोंडी आदेश प्राप्त झाले आहेत; मात्र अद्याप लेखी आदेश किंवा ई-मेल प्राप्त झालेला नाही. नागरिकांच्या घरात बळजबरीने स्मार्ट मीटर बसविणार्या एनसीसी कंपनीला थांबविण्याच्या सूचना देण्यात येतील तसेच नागरिकांचे निवेदन वरिष्ठांकडे पाठविले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande