उपराजधानी नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर - नितीन राऊत
मुंबई, 13 मार्च (हिं.स.) - राज्याची उपराजधानी नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली असून शहरात गुन्हेगारीचा सुळसुळाट वाढत असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत केला. गृहविभागाच्या अर्थसंकल्पीय मा
उपराजधानी नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर - नितीन राऊत


मुंबई, 13 मार्च (हिं.स.) - राज्याची उपराजधानी नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली असून शहरात गुन्हेगारीचा सुळसुळाट वाढत असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत केला. गृहविभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी नागपुरातील वाढते खून, अमली पदार्थांचा व्यापार आणि पोलिसांच्या पायाभूत सुविधांची दुरवस्था यावरून सरकारवर जोरदार टीका केली.

नागपुरात दर चार दिवसांनी एका खुनाची घटना घडत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीचा दाखला देत राऊत यांनी सांगितले. एका वर्षात ९० हून अधिक खुनांचे गुन्हे नोंदवले जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

गृहविभागाच्या अर्थसंकल्पात मोठी वाढ दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना सुरक्षिततेची भावना मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलीस यंत्रणा कागदोपत्री प्रक्रिया आणि औपचारिकतेमध्ये अडकली असून गुन्हेगारांवर वचक बसवण्यात ती अपयशी ठरत आहे, असे डॉ. राऊत म्हणाले.

तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात

यावेळी बोलतांना आमदार डॉ.नितीन राऊत यांनी नागपुराच्या उत्तर भागात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यापाराकडेही सरकारचे लक्ष वेधले. पाचपावलीसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना उघडकीस येणे ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मतदारसंघात तब्बल ७८ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले. जरीपटका परिसरात अल्पवयीन मुलेही अमली पदार्थांच्या व्यवहारात ओढली जात असल्याची गंभीर बाब डॉ. राऊत यांनी मांडली.

प्रशासकीय अनास्था आणि पायाभूत सोयी

पोलिसांच्या पायाभूत सुविधांबाबतही डॉ.नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. उत्तर नागपुरातील पोलीस ठाणे आजही शंभर वर्षांहून अधिक जुन्या इमारतींमध्ये कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. जरीपटका आणि कपिलनगरसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना स्वतंत्र व पुरेशी जागा उपलब्ध नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या वाढत असताना पोलीस यंत्रणेचे सक्षमीकरण मात्र पुरेसे झालेले नाही, असा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केला.

याशिवाय विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि दुग्ध व्यवसायातील समस्यांकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (NDDB) योजनांमध्ये केवळ नाममात्र निधी न ठेवता दूध संकलन वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विदर्भातील सुमारे सात हजार मालगुजारी तलावांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही डॉ. राऊत यांनी सभागृहात केली.

मुलींच्या बेपत्ता प्रकरणांवरही प्रश्न

आपण सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊंचा वारसा सांगतो; पण दुसरीकडे हजारो मुली बेपत्ता होत आहेत. ‘ऑपरेशन मुस्कान’सारख्या मोहिमा राबवूनही हा आकडा कमी का होत नाही?, असा सवाल उपस्थित करत डॉ. राऊत यांनी सरकारकडून ठोस उपाययोजनांची मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande