
मुंबई, 13 मार्च (हिं.स.)। देशात पुढील काही महिन्यांत लॅपटॉप आणि डेस्कटॉप संगणक खरेदी करणे ग्राहकांसाठी अधिक महाग ठरू शकते. प्रोसेसर, ग्राफिक्स कार्ड (जीपीयू) आणि मेमरीसारख्या महत्त्वाच्या घटकांच्या किमती वाढल्यामुळे या वर्षात संगणकांच्या किमतीत तब्बल 35 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या वाढत्या किमतींचा परिणाम संगणक बाजाराच्या वाढीवर होणार असून या वर्षी पीसी बाजारातील वाढ सुमारे 8 टक्क्यांनी कमी होऊ शकते. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या संगणकांसाठी लागणाऱ्या मेमरी आणि इतर घटकांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आयडीसी इंडियाचे वरिष्ठ बाजार विश्लेषक भरत शेनॉय यांच्या मते, रॅमच्या किमती आधीच 2.5 ते 3 पट वाढल्या आहेत. त्यामुळे लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या किमतीत आतापर्यंत 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच आणखी 8 ते 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून पुढील काही महिन्यांत आणखी 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते.
या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. पूर्वी 30 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असलेले लॅपटॉप आता जवळपास 45 हजार रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे शेनॉय यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थी, घरगुती वापरकर्ते आणि पहिल्यांदाच संगणक खरेदी करणाऱ्यांसाठी संगणक घेणे अधिक कठीण होऊ शकते.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते मेमरीच्या किमती वाढण्यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरची वाढती मागणी हे मोठे कारण आहे. अनेक कंपन्या आता उच्च-मार्जिन सर्व्हर आणि उच्च बँडविड्थ मेमरीच्या उत्पादनाकडे वळत आहेत. त्यामुळे सामान्य लॅपटॉप आणि पीसीसाठी वापरले जाणारे घटक महाग होत आहेत. याशिवाय इंटेलच्या एंट्री-लेव्हल प्रोसेसरच्या कमतरतेमुळेही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.
मध्यपूर्वेतील तणावाचाही या परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज परिसरातील तणाव वाढल्यास ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सेमीकंडक्टर उत्पादनाचा खर्च वाढून चिप्सच्या उपलब्धतेवर आणि किमतींवरही परिणाम होऊ शकतो.
गेल्या वर्षी भारतीय पीसी बाजाराने विक्रमी कामगिरी केली होती. आयडीसीच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये देशात 1.59 कोटी संगणकांची शिपमेंट झाली होती, जी वर्षाच्या तुलनेत 10.2 टक्के वाढ होती. मात्र यावर्षी वाढलेल्या किमतींमुळे मागणी कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आता सवलती, ईएमआय योजना आणि प्रमोशनल ऑफर्सचा आधार घेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर कोणी लॅपटॉप किंवा पीसी खरेदी करण्याचा विचार करत असेल, तर पुढील काळात किमती आणखी वाढण्यापूर्वी खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule