
पानीपत, 13 मार्च (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आज, शुक्रवारी औपचारिक दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन झाले. संघाचे सह-सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात सी. आर. मुकुंद यांनी सांगितले की, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या बैठकीला विशेष महत्त्व आहे. या शताब्दी वर्षात देशभरातील स्वयंसेवक संघटनात्मक विस्तार आणि सामाजिक उपक्रम अधिक मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत. देशाच्या विविध भागांतून आलेले सर्व प्रतिनिधी मोठ्या उत्साहाने या बैठकीत सहभागी झाले आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही संघाकडून स्मरण करण्यात आले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, तमिळ चित्रपटसृष्टीतील नामांकित व्यक्तिमत्त्व एम. सरवनन आणि मुरुगप्पा समूहाचे माजी प्रमुख एम. वेलायन यांच्यासह उद्योग आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांना देखील स्मरण करण्यात आले.संघाचे शताब्दी वर्ष सुरू असल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून संघाचे कार्यकर्ते शाखा आणि विविध उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे शाखांमध्ये उपस्थितीही वाढल्याचे मुकूंद यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा हरियाणातील समालखा (पानीपत) येथे 13, 14 आणि 15 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. संघाच्या दृष्टीने ही बैठक सर्वोच्च निर्णय घेणारी सभा मानली जाते. दरवर्षी आयोजित होणारी ही बैठक यंदा ग्राम विकास आणि सेवा साधना केंद्र, पट्टीकल्याणा, समालखा येथे होत आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विजयादशमी उत्सव, गृहसंपर्क अभियान, हिंदू संमेलन, युवा संमेलन, प्रमुख नागरिक बैठक तसेच सामाजिक सद्भाव बैठकींसारख्या कार्यक्रमांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.तसेच 2025-26 या वर्षातील संघाच्या कार्याचा आढावा आणि विविध प्रांतांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमांवरही या प्रतिनिधी सभेत सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी