फेब्रुवारीत किरकोळ महागाई दर 3.21 टक्क्यांवर
नवी दिल्ली, 13 मार्च (हिं.स.)। देशातील किरकोळ महागाई दरात फेब्रुवारी 2026 मध्ये किरकोळ वाढ झाली असून तो 3.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एमओएसपीआय) यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2026 म
Retail Inflation Rate Rises to 3.21% in February


नवी दिल्ली, 13 मार्च (हिं.स.)। देशातील किरकोळ महागाई दरात फेब्रुवारी 2026 मध्ये किरकोळ वाढ झाली असून तो 3.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एमओएसपीआय) यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2026 मध्ये हा दर 2.74 टक्के होता. त्यामुळे एका महिन्यात महागाई दरात सुमारे 0.47 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे 2024 हे नवे आधार वर्ष मानून तयार करण्यात आलेल्या ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) मालिकेतील हा दुसरा मासिक आकडा आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात अन्नपदार्थांच्या किंमतींमध्ये वर्षभराच्या तुलनेत 3.47 टक्क्यांची वाढ झाली. तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई दर 2.12 टक्के इतका असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र वार्षिक महागाई दरात वाढ झाली असली तरी मासिक आधारावर काही वस्तूंमध्ये ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात टोमॅटो, मटार आणि फ्लॉवर यांसारख्या प्रमुख भाजीपाल्यांच्या किंमतींमध्ये 10 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात महागाई कमी राहिली त्यात लसूण, कांदा आणि बटाटा यासारख्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे. लसणाच्या दरात वार्षिक आधारावर 31.09 टक्के घसरण झाली. तर, कांद्याच्या दरात वार्षिक आधारावर 28.20 टक्के घसरण झाली. तर, बटाट्याच्या दरात वार्षिक आधारावर 18.46 टक्के घसरण झाली.

दुसरीकडे काही वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली. सर्वाधिक महागाई चांदीच्या दागिन्यांमध्ये दिसून आली. वार्षिक आधारावर किंमत 160.84 टक्क्यांनी वाढली आहे. सोने, हिरे, आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांची महागाई 48.16 टक्के राहिली आहे. खोबऱ्याचे दर 46.16 टक्क्यांनी, टोमॅटोचे दर 45.29 टक्के आणि फ्लॉवरच्या दरात 43.77 टक्के महागाई दिसून आली.

सीपीआयच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. फेब्रुवारीत फूड अँड बेवरेजेज कॅटेगरीत महागाई 3.35 टक्के राहिली. तंबाखूजन्य पदार्थांची महागाई 3.49 टक्के, कपडे आणि फूटवेअरमध्ये महागाई 2.81 टक्के, हाऊसिंग पाणी, वीज गॅस आणि इतर इंधन यासारख्या कॅटेगरीत महागाई 1.52 टक्क्यांनी वाढली. ट्रान्सपोर्ट कॅटेगरीत महागाई कमी झाली. शैक्षणिक सेवांमध्ये महागाई 3.33 टक्के राहिली. रेस्टॉरंट आणि हटेल सेवांमध्ये महागाई 2.73 टक्के होती.

केंद्र सरकारने यंदाच्या जानेवारीपासून महागाई मोजण्याची पद्धत अद्ययावत करत 2012 या जुन्या आधार वर्षाऐवजी 2024 हे नवे आधार वर्ष स्वीकारले आहे. हा बदल 2023-24 च्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणावर (एचसीईएस) आधारित आहे. नव्या मालिकेचा उद्देश आधुनिक भारतातील बदललेल्या उपभोग पद्धती अधिक अचूकपणे दर्शवणे हा आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या खर्चाच्या बास्केटमध्ये ओटीटी सब्सक्रिप्शन, डिजिटल स्टोरेज, स्मार्टफोन यांसारख्या आधुनिक खर्चांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी अन्नपदार्थांच्या वजनात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

ही आकडेवारी तयार करताना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ( एनएसओन) ने देशभरातील 1407 शहरी बाजारपेठा आणि 1465 गावांमधून साप्ताहिक आधारावर किंमती गोळा केल्या. फेब्रुवारी महिन्यात 99 टक्क्यांहून अधिक बाजारपेठांमधून किंमतींची माहिती प्राप्त झाल्याने या आकडेवारीची विश्वासार्हता अधिक बळकट झाल्याचे सांगितले जाते.

सध्याचा 3.21 टक्के महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने निश्चित केलेल्या 2 ते 6 टक्के सहिष्णुता मर्यादेत आहे. तसेच हा दर केंद्रीय बँकेच्या 4 टक्के मध्यम लक्ष्यापेक्षाही खाली आहे. त्यामुळे महागाई तुलनेने नियंत्रणात असल्याचे चित्र दिसत असून आगामी काळात व्याजदर आणि मौद्रिक धोरणाबाबत निर्णय घेताना आरबीआयला काही प्रमाणात लवचिकता मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, मार्च 2026 महिन्याचा पुढील महागाईचा आकडा 13 एप्रिल रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande