वर्क फ्रॉम होम आमिषाने ₹24.59 लाखांची सायबर फसवणूक
लातूर, 14 मार्च (हिं.स.)। ‘घरबसल्या लाखो रुपये कमवा’ अशा ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला भुलून प्रकाशनगर येथील ३४ वर्षीय पवनकुमार राजकुमार गंडले यांची तब्बल २४ लाख ५९ हजार ३५२ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलि
सायबर गुन्हा


लातूर, 14 मार्च (हिं.स.)। ‘घरबसल्या लाखो रुपये कमवा’ अशा ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला भुलून प्रकाशनगर येथील ३४ वर्षीय पवनकुमार राजकुमार गंडले यांची तब्बल २४ लाख ५९ हजार ३५२ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाणे येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बेरोजगार असलेल्या पवनकुमार गंडले यांच्याशी टेलिग्रामवरून संपर्क साधत एका व्यक्तीने स्वतःला ‘COS’ कंपनीचा एजंट असल्याचे सांगितले. घरबसल्या ऑनलाईन गुंतवणूक केल्यास मोठे कमिशन मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना एका लिंकवर नोंदणी करायला लावले.

सुरुवातीच्या तीन व्यवहारांमध्ये गंडले यांनी ७४ हजार ७२१ रुपये भरले असता आरोपीने विश्वास बसावा म्हणून १ लाख १३ हजार १३ रुपये परत पाठवले. यानंतर मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी पडून गंडले यांनी यूपीआय व विविध बँक खात्यांवर तब्बल १४ व्यवहारांतून २४ लाख ५९ हजार ३५२ रुपये पाठवले.

मात्र, मुद्दल व कमिशन परत मागितल्यावर आरोपीने टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गंडले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, तसेच टेलिग्राम व व्हॉट्सॲपवर येणाऱ्या गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande