कोल्हापूर : बामणी येथील सौर प्रकल्पास विभागीय आयुक्तांची भेट
कोल्हापूर, 14 मार्च (हिं.स.)। ''मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०'' अंतर्गत बामणी (ता. कागल) येथील गट क्रमांक ६८२ मधील ५ हेक्टर जमिनीवर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सौर कृषी वाहिनी प्रकल्पास पुणे विभागीय आयुक्त डॉ. च
सौर कृषी वाहिनी प्रकल्पास पुणे विभागीय आयुक्त डॉ.  पुलकुंडवार यांची भेट


कोल्हापूर, 14 मार्च (हिं.स.)। 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' अंतर्गत बामणी (ता. कागल) येथील गट क्रमांक ६८२ मधील ५ हेक्टर जमिनीवर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सौर कृषी वाहिनी प्रकल्पास पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचे दिवसा वीज मिळण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, खाजगी जागा भाडेतत्त्वावर घेताना शासनाकडून प्रति हेक्टरी वार्षिक १ लाख २५ हजार रुपये दिले जाणार असून, या भाड्यामध्ये दरवर्षी ३ टक्के वाढ केली जाणार आहे. ज्या ठिकाणी पडीक जमीन किंवा गायरान जमीन उपलब्ध आहे, तिथे असे प्रकल्प उभारता येतील, ज्याचा सर्वांनाच फायदा होईल. 'प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत'ही जिल्ह्याची कामगिरी उत्तम असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे. स्वतःच्या छताचा वापर करून सौर ऊर्जा निर्मिती केल्यास वीज बिल शून्य होण्यास मदत होईल.

महावितरणमार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या भेटीवेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, बामणीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच महसूल व महावितरणचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

क्षेत्रफळ: बामणी येथील सुमारे साडेबारा एकर शासकीय गायरान जमिनीवर हा प्रकल्प उभारला आहे.

• सद्यस्थिती: दोन महिन्यांपूर्वी हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला असून, यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा होत आहे.

• नियोजन: जिल्ह्यात ४६ उपकेंद्रांमार्फत एकूण १७० मेगावॅट सौर ऊर्जेचे नियोजन होते. त्यापैकी १०६ मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली असून उर्वरित ६४ मेगावॅटचे काम प्रगतीपथावर आहे.

• खाजगी सहभाग: भविष्यात सरकारी जमीन उपलब्ध नसल्यास खाजगी जमीन भाडेतत्त्वावर घेऊन सौर प्रकल्प उभारले जातील.

जिल्ह्यात आतापर्यंत ४० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सौर संच बसवण्यात आले आहेत. यामुळे अनेक ग्राहकांचे वीज बिल शून्य झाले असून, अतिरिक्त वीज महावितरणला विकून त्यांना मोबदलाही मिळत आहे. तरी सर्व नागरिकांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना' व 'प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा' लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande