
रायगड, 14 मार्च (हिं.स.)। हरवलेले अथवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याच्या मोहिमेत म्हसळा पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. तांत्रिक तपासाच्या मदतीने एकूण सहा मोबाईल शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या कामगिरीमुळे म्हसळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना विशेष सूचना देत प्रभावी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता गर्जे यांच्या देखरेखीखाली म्हसळा पोलिसांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
भारत सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलचा प्रभावी वापर करून हरवलेल्या मोबाईलचा माग काढण्यात आला. म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे आणि पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र कांबळे यांनी तांत्रिक तपास करून या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सहा महागडे मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.
मयुर मनोहर तांबे, प्रितेश चिविलकर, इनायतुल्ला डावरे यांच्यासह इतर नागरिकांचे हरवलेले मोबाईल परत देण्यात आले. बराच काळ हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने संबंधित नागरिकांनी आनंद व्यक्त करत म्हसळा पोलिसांचे आभार मानले.दरम्यान, मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)