
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : वरचे वरवडे (ता. रत्नागिरी) यथील सुपुत्र वेद अश्विनीकुमार जोशी यांनी संस्कृत व न्यायशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
वेद जोशी यांनी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले होते. विशेष म्हणजे संस्कृत विषयात त्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर त्यांनी संस्कृतचे सखोल शिक्षण घेण्यासाठी गोव्यातील काणकोण येथे टेंगसे गुरुजी यांच्या वाग्वर्धिनी पाठशाळेत प्रवेश घेतला. तेथे ते न्यायशास्त्राचे अध्ययन करत आहेत.
याच शिक्षणाच्या बळावर त्यांनी २०२४ साली काशी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत साहित्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र आणि २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले होते. यावर्षीही राष्ट्रीय संस्कृत संस्थानतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील न्यायशास्त्रातील 'सव्याभिचार' ग्रंथावर आधारित न्यायशलाका स्पर्धेत वेद जोशी यांनी पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना न्यायशलाका सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र आणि २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार कांची येथे श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विश्वविद्यालायात भारताचे शंकराचार्य वजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.स्पर्धेत देशभरातून सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तेथे ३२ विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सहा स्पर्धांमधून वेद जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी