अफवा पसरवणाऱ्या संजय राऊतांची गटारगंगा ही राष्ट्रीय आपत्ती - नवनाथ बन
मुंबई, 14 मार्च, (हिं.स.)। देशात अफवा पसरवून अराजक पसरवण्याचा प्रयत्न संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेमधून करतात. देशाच्या विरोधात बोलणाऱ्या संजय राऊतांची गटारगंगा ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली पाहिजे. राऊतांनी तोंड उघडलं की ते या देशाबद्दल
नवनाथ बन


मुंबई, 14 मार्च, (हिं.स.)। देशात अफवा पसरवून अराजक पसरवण्याचा प्रयत्न संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेमधून करतात. देशाच्या विरोधात बोलणाऱ्या संजय राऊतांची गटारगंगा ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली पाहिजे. राऊतांनी तोंड उघडलं की ते या देशाबद्दल कधीही चांगलं बोलत नाहीत. राऊतांनी तोंड उघडलं की भारताची बदनामी सुरू होते, राऊतांनी तोंड उघडलं की पाकिस्तानचा उदो उदो सुरु होतो, असा घणाघात भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.बन बोलत होते.

श्री. बन म्हणाले की,संजय राऊत गॅस टंचाई बाबत दररोज अफवा पसरवत आहेत. शहरांमध्ये बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांमध्ये सामान्य माणसाला घरपोच सिलेंडर मिळतो आहे. काही ठिकाणी निश्चित तुटवडा आहे. परंतु वितरकांनी साठेबाजी केल्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला. याबाबत केंद्र व राज्य सरकार अतिशय सजग आहे. घरगुती सिलेंडरची कुठेही कमतरता पडणार नाही. मागणी नोंदवलेल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत सिलेंडर पोहचला जाण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

सध्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी 140 कोटी भारतीयांची काळजी घेण्यासाठी अतिशय सक्षम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रोज बैठका होत आहेत. इराण कडून कच्च्या तेलाचा सुरक्षित पुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो आहे. वेगवेगळ्या 40 देशांकडून आपण कच्चे तेल आयात करतो आहोत. देशात कुठेही पेट्रोल डिझेल साठी रांगा लागलेल्या नाहीत. फक्त काही ठिकाणी गॅसचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्याचाही फटका नागरिकाला बसू नये यासाठी केंद्र सरकार काळजी घेते आहे, असेही श्री. बन यांनी नमूद केले.

राहुल गांधी, काँग्रेस पक्ष, संजय राऊत, उबाठा कडून सामान्य माणसांमध्ये असंतोष निर्माण होण्यासाठी गॅस टंचाई बाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. काँग्रेसच्या या वर्तनाविरोधात भाजपाकडून देशभर आंदोलन केले जात आहे. अनेक ठिकाणी काही राजकीय पक्षांकडून, काही लोकांकडून जाणीवपूर्वक सिलेंडरची साठेबाजी केली जात आहे. या साठेबाजांवर कारवाई करण्यात येईल. केंद्र सरकार व राज्य सरकार साठेबाजांवर कारवाई करत आहे. असे असताना संजय राऊत, राहुल गांधी यांच्यासारखे नेते देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करत आहेत, असेही श्री. बन म्हणाले.

*आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली*

मिठी नदीचा गाळ खाऊन कोण श्रीमंत झालं, मिठी नदीच्या गाळातून कोणी घर बांधले हे मुंबईकरांना माहित आहे. या घोटाळ्यातला दिनो मोरिया कोणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठी नदीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटलं याची इत्यंभूत माहिती सगळ्यांना आहे. संजय राऊत हे मिठी नदीचा वारंवार उल्लेख करून आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांना संपवायचं आणि संपूर्ण उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, याच साठी संजय राऊत मिठी नदी, मिठी नदी चा गाळ याबद्दल चर्चा होण्याचा प्रयत्न करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande