
पालघर, 14 मार्च (हिं.स.)।
पालघर पूर्व भागातील वीरेंद्र नगर परिसरात राहणाऱ्या तीन तरुणांचा मालवाहू गाडीच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी (दि. १३ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास गांधीनगर परिसरातून रेल्वे मार्ग ओलांडत असताना हा भीषण अपघात झाला.
मृतांमध्ये अफरोज खालिद शेख (२७), स्वप्नील शैलेंद्र पलांडे (२३) आणि कुणाल कुमार दुबळा (२३) यांचा समावेश आहे. हे तिन्ही तरुण पालघर पूर्वेकडील वीरेंद्र नगर येथे वास्तव्यास असून मजुरी व खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही तरुण शुक्रवारी संध्याकाळी गांधीनगर परिसरातून परतत असताना समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गावरून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी वेगाने येणाऱ्या मालवाहू गाडीची चाहूल न लागल्याने गाडीने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे वीरेंद्र नगरसह संपूर्ण पालघर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पालघर रेल्वे स्थानक परिसरात गेल्या काही वर्षांपासून रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या घटनांची मालिका घडल्याने रेल्वे प्रशासनाने जुन्या पालघर हनुमान मंदिराजवळील अनधिकृत रेल्वे क्रॉसिंग पूर्णपणे बंद केले आहे. तरीही काही नागरिक कुंपणात छेद करून शॉर्टकटचा मार्ग वापरत असल्याचे दिसून येत आहे.
प्रवाशांनी रूळ ओलांडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सूचना व जनजागृती केली जात असली तरी अनेकजण शॉर्टकटच्या नादात जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL