
लातूर, 14 मार्च (हिं.स.)।
आपण बाजारात गेल्यानंतर अतिशय आवडीने आणि आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून फळे खरेदी करतो. मात्र, उदगीर शहरातून एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमचे डोके चक्रावून जाईल. उदगीर शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात चक्क नालीत पडलेली फळे उचलून धुुऊन ती पुन्हा विक्रीसाठी स्टॉलवर ठेवली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
व्हिडीओच्या माध्यमातुन मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एका फळविक्रेत्याची काही फळे चुकून जवळच असलेल्या सांडपाण्याच्या नालीत पडली. मात्र, ती फेकून देण्याऐवजी किंवा स्वच्छ करण्याऐवजी, संबंधित विक्रेत्याने ती घाणेरड्या नालीतून उपसली ती थातुर मातुर धुतली आणि थेट विक्रीसाठी असलेल्या इतर फळांच्या ढिगाऱ्यात मिसळली. हा सर्व प्रकार तिथल्याच एका सजग नागरिकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
सध्या लातूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असून साथीच्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत उघड्यावरील आणि घाणेरड्या ठिकाणची फळे खाल्ल्याने टायफॉइड, कॉलरा किंवा गॅस्ट्रोसारखे गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते. केवळ स्वार्थापोटी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
सोशल मीडियावर संतापाची लाट
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. आम्ही पैसे देऊन आजार विकत घ्यायचे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. अन्न व औषध प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन या अशा बेजबाबदार विक्रेत्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस फ्लॅश न्यूज कडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की फळे किंवा भाजीपाला खरेदी करताना तो स्वच्छ आहे का, याची खात्री करा. शक्यतो विश्वासाच्या ठिकाणाहूनच खरेदी करा आणि घरी नेल्यावर फळे कोमट पाण्यात धुवूनच वापरा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis