धारणीत घरगुती गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई चौकशीसाठी शिवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती, 15 मार्च (हिं.स.)। शहरातील गॅस एजन्सीकडून सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याप्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख शैलेंद्र मालवीय यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे लेखी तक्
धारणीत घरगुती गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई चौकशीसाठी शिवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन


अमरावती, 15 मार्च (हिं.स.)।

शहरातील गॅस एजन्सीकडून सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याप्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख शैलेंद्र मालवीय यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे लेखी तक्रार देत तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी केली. तक्रारीनुसार, मागील आठ ते दहा दिवसांपासून धारणी तालुक्यातील ग्राहकांना सिलिंडर मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एजन्सीकडून मोबाईल बुकिंग सेवा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना एजन्सी कार्यालयासमोर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेकांचे बुकिंग झालेले असतानाही त्यांना सिलिंडर घेण्यासाठी गोदामात पाठवले जात असून तेथेही प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मोबाईल बुकिंग सेवा मुद्दाम बंद ठेवून बाजारात सिलिंडरची काळाबाजारात विक्री करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय शासन नियमांनुसार गॅस सिलिंडरची घरपोच सेवा देणे बंधनकारक असतानाही एजन्सीकडून वितरणाची वाहने बंद ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शैलेंद्र मालवीय यांनी प्रशासनाला दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande