सीसीआयची कापूस खरेदी बंद : मुदतवाढीची मागणी १८.८० लाख क्विंटल खरेदी
अमरावती, 15 मार्च (हिं.स.)। हमीदराने सीसीआयकडून कापसाची खरेदी बंद झाली आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक असल्याने खरेदीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली असली तरी ती मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात
सीसीआयची कापूस खरेदी बंद : मुदतवाढीची मागणी १८.८० लाख क्विंटल खरेदी


अमरावती, 15 मार्च (हिं.स.)।

हमीदराने सीसीआयकडून कापसाची खरेदी बंद झाली आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक असल्याने खरेदीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली असली तरी ती मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात अंदाजे १८.८० लाख क्विंटल कापसाची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील एफएक्यू दर्जाचा कापूस संपल्याचा दावा करीत सीसीआयने खरेदी बंद केली आहे. कापूस पणन महासंघ मोडीत काढत कापसाची खरेदी सीसीआयमार्फत करण्यात येत आहे. यंदा सीसीआयने लवकर १० नोव्हेंबरपासूनच हमीदराने खरेदी सुरू केली. यंदाच्या हंगामात लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार ११० रुपये व मध्यम धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल सात हजार ११० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. अमरावती जिल्ह्यातील नऊ बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली.

बाजारातील कापसाची मागणी, उठाव व मिळणारे दर बघता यंदा शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्यास प्राधान्य दिले होते. खरेदीची मुदत २७ फेब्रुवारीस संपली होती. मात्र शेतकऱ्यांचा प्रतिसाद व मुदतवाढीची मागणी बघता १५ मार्चपर्यंत मुदतवाढ सीसीआयने दिली होती. एक ते १५ मार्च, या कालावधीत आलेल्या शासकीय सुट्या व सार्वजनिक सुट्या बघता नऊ दिवसच खरेदी झाली. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात १० नोंव्हेबर ते १३ मार्च या कालावधीत १८ लाख ८० हजार क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयकडून करण्यात आली. सर्वाधिक खरेदी दर्यापूर व अंजनगावसुर्जी या बाजार समिती कार्यक्षेत्रात नऊ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्याखालोखाल अमरावती बाजार समितीच्या क्षेत्रात अडीच लाख क्विंटलची खरेदी झाली आहे. तर चांदूरबाजार, अचलपूर, धामणगावरेल्वे प्रति दीड क्विंटल, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर व वरुड या बाजार समितीच्या क्षेत्रात ६० हजार क्विंटलची खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.

पडत्या दराने विक्री शेतकऱ्यांकडील पहिल्या वेच्यातील एफएक्यू दर्जाचा कापूस जवळपास संपला असून आता दुसऱ्या व तिसऱ्या वेच्यातील कापूस येऊ लागला आहे, असे सीसीआयचा दावा आहे. हा कापूस सीसीआय खरेदी करीत नसल्याने तो खुल्या बाजारात पडत्या दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काही शेतकऱ्यांकडे मात्र एफएक्यू दर्जाचा कापूस शिल्लक असल्याने किमान ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही एक एप्रिलपर्यंत खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी सीसीआयकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande