
अमरावती, 15 मार्च (हिं.स.)।
मेळघाटातील पाणीटंचाईची झळ आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेली दिसून येते. कचेरीत येणाऱ्या अभ्यागतांची तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर कार्यालयातील कुलर्सचे सांगाडे तेवढे उरले आहेत. पाण्याअभावी या परिसरातील झाडेसुद्धा वाळण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील झाडांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. कार्यालयासमोरील बगीचा तसेच बाजूच्या बगीचातील झाडांना मर्यादित स्वरूपात पाणी दिले जात असल्याने अनेक झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. शोभिवंत झाडे सुद्धा वाळली आहेत.
जीवाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतामानात आपली कैफियत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना आपली तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागते. कार्यालयाच्या परिसरात तीन ठिकाणी वॉटरकूलर लागले असून त्यापैकी दोन बंद आहेत. अभ्यागतांसाठी केवळ दोनच पाण्याच्या कॅन लावण्यात येतात आणि त्यासुद्धा दुपारी दोनपर्यंत संपून जातात. त्यामुळे नागरिकांना बाहेरील दुकानांतून पाण्याची बाटली विकत घेऊन आपली तहान भागवावी लागते. ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करून पाणी आणण्यासाठी जावे लागते, अशी परिस्थिती आहे. एरवी सर्व विभागांमध्ये असलेले कूलर यंदा पाण्याअभावी बंदच आहेत. ठिकठिकाणी कूलरचे सांगाडे फक्त दिसतात. मात्र अधिकाऱ्यांच्या कक्षात एसी असल्याने त्यांना फारशी अडचण येत नाही. एकूणच जिल्ह्याच्या कारभाराचे प्रमुख केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयालाच सध्या पाणीटंचाई भेडसावत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर दोन कॅन आणल्या जातात, त्यासुद्धा काही वेळातच संपून जातात. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी आपल्या सोबत पाणी आणतात. मात्र अभ्यागतांना भटकंती करावी लागते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरील वॉटरकूलर तेवढे सुरू आहेत. मात्र तेथेसुद्धा ग्लास किंवा बाटली नसल्याने अनेकजण ओंजळीत पाणी घेऊन आपली तहान भागवितात.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी