
अकोला, 15 मार्च, (हिं.स.)। पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील युसुफ शाह यांचे घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले तरीही तिसरा हप्ता दोन महिन्यापासून थांबविल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यासमोर २४ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पातूरचे तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून दिला आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, घरकुल अभियंता, ग्राम पंचायत सचिव व सरपंच यांनी संगनमत करून आठवडी बाजारातील ओटे व सार्वजनिक रस्त्यावर घरकुलाचे बांधकाम केल्याने आर्थिक व्यवहार करून त्यांचे हप्ते काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम न करता देखील हप्ते काढल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच गावात प्रवासी निवारा, समाज मंदिर, सचिव निवासस्थान आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून, त्यावर कोणतीही कारवाई होत नसून, स्वतःचे घरकुल पूर्ण असूनही तिसरा हप्ता मिळवण्यासाठी ग्राम पंचायत सचिवाकडून पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात कारवाई न झाल्यास २४ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी,यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे