मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर चर्चेत
मुंबई, 15 मार्च (हिं.स.)। मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दरवर्षीप्रमाणे होणारा गुढीप
MNS Gudi Padwa Rally Teaser


मुंबई, 15 मार्च (हिं.स.)। मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दरवर्षीप्रमाणे होणारा गुढीपाडवा मेळावा यंदाही चर्चेचा विषय ठरला आहे. १९ मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्याचा टीझर सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याने राजकीय वर्तुळातही उत्सुकता निर्माण केली आहे.

या टीझरमध्ये सुरुवातीलाच महाराष्ट्रातील नागरिकांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. “महाराष्ट्रात जे चाललंय ते पटत नाहीये? रोज घडणाऱ्या घटनांमुळे मनस्ताप होतोय? महाराष्ट्राची ही अवस्था पाहून तुम्ही अस्वस्थ झाला आहात?” असे प्रश्न विचारत नागरिकांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, “तुम्ही एकटे नाहीत, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला असंच वाटतंय,” असा संदेश देत नागरिकांना मेळाव्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

टीझरमध्ये पुढे “चला शिवतीर्थावर भेटूया, उज्ज्वल महाराष्ट्राचा मार्ग ठरवूया,” असा संदेश देण्यात आला असून त्यामुळे या मेळाव्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. टीझरच्या शेवटी गुढीपाडवा मेळाव्याचे ठिकाण आणि वेळही जाहीर करण्यात आली आहे. हा मेळावा मुंबईतील शिवतीर्थ (शिवाजी पार्क) येथे सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडत असतात. त्यामुळे यंदाच्या मेळाव्यात ते नेमके कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, तसेच महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर ते काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, टीझरमध्ये विचारलेले प्रश्न हे सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारण, सामाजिक घडामोडी आणि महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर येत्या गुढीपाडवा मेळाव्यातून महाराष्ट्रासाठी “उज्ज्वल मार्ग” कोणता असू शकतो, याबाबत राज ठाकरे काय मांडणी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande