पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रमांची गरज - उदय सामंत
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रमांची मोठी गरज असून, लोकसहभागातून उभारलेली ही देवराई भविष्यात निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. कळंबस्ते (ता. चिपळूण) येथे
पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रमांची गरज - उदय सामंत


रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रमांची मोठी गरज असून, लोकसहभागातून उभारलेली ही देवराई भविष्यात निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

कळंबस्ते (ता. चिपळूण) येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे तसेच या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रांताधिकारी आकाश लिगाडे व प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.

प्रांताधिकारी कार्यालय व सह्याद्री निसर्ग मित्र संस्था यांच्या पुढाकारातून कळंबस्ते (रेल्वे फाटकाजवळ) येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर श्री. सामंत बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, मुख्याधिकारी संजय जाधव, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी देवराई बोटॅनिकल गार्डनची पाहणी केली. ते म्हणाले, कोकणातील नैसर्गिक संपदा आणि जैवविविधता जपणे ही काळाची गरज आहे. कळंबस्ते येथे उभारलेली ही देवराई केवळ वृक्षसंवर्धनाचा प्रकल्प नसून, पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी ही देवराई उपयुक्त ठरेल. अशा प्रकारचे उपक्रम पुढील काळातही अधिक ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला जाईल.

एखाद्या महसूल अधिकाऱ्यांनी ठरविले तर तो काय करू शकतो, हे या विधायक कामात दिसत आहे. ही देवराई अशीच जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

आमदार श्री. निकम म्हणाले, कळंबस्ते येथे उभारण्यात आलेले हे ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ स्थानिक जैवविविधतेचे जतन, पर्यावरण शिक्षण आणि निसर्ग पर्यटनाला चालना देणारे ठरेल.

हा प्रकल्प आरजीपीपीएल (RGPPL) आणि नेरोलॅक (NEROLAC) यांच्या प्रायोजकत्वातून साकारण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande