
अमरावती, 15 मार्च (हिं.स.)। राज्य परिवहन विभागाने ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवान्यांबाबत सुरू असलेल्या खुल्या धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नवीन परवान्यांसाठी दिले जाणारे इरादापत्र देण्याचे काम थांबविण्यात आले. नुकत्याच राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या धोरणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी आणि विनंती अर्जांचा विचार करून हे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने १७ जुलै २०१७ रोजीच्या अधिसुचनेद्वारे जुन्या निर्णयांमध्ये बदल करून नवीन टॅक्सी आणि ऑटोरिक्षा परवाने जारी करण्यावरील निर्बंध हटवले होते, ज्यामुळे परवाने मिळणे सुलभ झाले होते. मात्र, या खुल्या धोरणामुळे रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगत राज्यातील विविध संघटनांनी हे धोरण बंद करण्याची मागणी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता नवीन परवाने देण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी स्पष्ट केले.
-------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी