
अमरावती, 15 मार्च (हिं.स.)भारत सरकारच्या बेटी बचाव, बेटी पढाओ आणि महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत अमरावती डाक विभागातर्फे १६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत सुकन्या समृद्धी खाते आणि आरडी खाते घरोघरी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शून्य ते १० वर्षे वयोगटातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये बचतीची सवय रुजविण्यासाठी डाक विभाग विशेष पुढाकार घेत आहे. या विशेष मोहिमेंतर्गत पालक १० वर्षांपर्यंतच्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही नजीकच्या डाकघरात किमान २५० रुपये भरून उघडू शकतात. या योजनेवर सध्या ८.२ टक्के व्याजदर मिळत असून, खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड तसेच पालकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याशिवाय, बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी किमान १०० रुपये भरून आवर्ती ठेव (आरडी) खातेही उघडता येणार आहे, ज्यावर ६.७ टक्के व्याजदर लागू आहे. या खात्यासाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक असून सर्वसामान्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शाळा, अंगणवाड्या आणि घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत. पालकांनी आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी खाते उघडून एक भरीव पाऊल उचलावे आणि स्वतःसाठी बचतीची सवय लावण्यासाठी आरडी खात्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर पी. ए. गेडाम यांनी केले आहे.
--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी