हॉर्मुज सामुद्रधुनीत ऑस्ट्रेलिया आणि जपानचा नौदल पाठवण्यास नकार
वॉशिंगटन, 16 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये इराणसोबत सातत्याने वाढत असलेल्या तणावामुळे तेलपुरवठ्याचा मुख्य समुद्री मार्ग असलेली हॉर्मुज सामुद्रधुनी गंभीरपणे प्रभावित होत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे सात देशांना
हॉर्मुज सामुद्रधुनीत ऑस्ट्रेलिया आणि जपानचा नौदल पाठवण्यास नकार


वॉशिंगटन, 16 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये इराणसोबत सातत्याने वाढत असलेल्या तणावामुळे तेलपुरवठ्याचा मुख्य समुद्री मार्ग असलेली हॉर्मुज सामुद्रधुनी गंभीरपणे प्रभावित होत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे सात देशांना हॉर्मुज सामुद्रधुनीत आपली युद्धनौका तैनात करण्याची मागणी केली आहे. या देशांनी आपले नौदल पाठवून या मार्गाची सुरक्षा करावी, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. मात्र अमेरिकेच्या जवळच्या सहयोगी देशांनी या मागणीबाबत अत्यंत सावध भूमिका घेतली असून काही देशांनी तर याला स्पष्ट नकार दिला आहे.

ऑस्ट्रेलियाने या प्रदेशात नौदल सहाय्य देण्यास नकार दिला आहे. कॅबिनेट मंत्री कॅथरीन किंग यांनी सांगितले की हा समुद्री मार्ग अत्यंत महत्त्वाचा असला तरी ऑस्ट्रेलियाकडे जहाजे पाठवण्याची कोणतीही योजना नाही. तसेच या संदर्भात त्यांना कोणतीही अधिकृत विनंती मिळालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात जपानची भूमिकाही साधारण अशीच आहे. पंतप्रधान साने ताकाइची यांनी सोमवारी संसदेत सांगितले की सध्या पश्चिम आशियामध्ये जहाजांच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचा कोणताही विचार नाही. जपानने अद्याप कोणत्याही लष्करी सहभागाला मंजुरी दिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार सध्या आपल्या कायदेशीर चौकटीत राहून स्वतंत्रपणे काय करता येईल, याचा अभ्यास करत आहे.

दक्षिण कोरियानेही सांगितले आहे की, या मुद्द्यावर तो वॉशिंग्टनसोबत चर्चा करत आहे. सियोल येथील राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या प्रकरणात कूटनीतिक मार्ग अवलंबला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करून समुद्री मार्ग पुन्हा सुरू करण्याची गरज अधोरेखित केली, जेणेकरून जगभरातील मालवाहतूक विस्कळीत होऊ नये. स्टार्मर यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशीही या संकटावर चर्चा केली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांना या परिसरात आपली युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून तेलवाहू आणि कंटेनर जहाजांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करता येईल. या मोहिमेसाठी ज्यांची नावे समोर आली आहेत, त्यामध्ये चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाने सार्वजनिकरित्या ठोस समर्थन जाहीर केलेले नाही.

जागतिक तेल व्यापारासाठी हॉर्मुज जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अंदाजे जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा याच समुद्री मार्गातून होतो. मात्र मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे या मार्गावरील जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढताना दिसत आहेत. हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्यास भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande