इराण- अमेरिका- इस्रायल युद्धाचा १७वा दिवस, मध्य पूर्वेत तणाव वाढला
तेहरान , 16 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायलसोबत इराणचा सुरू असलेला संयुक्त संघर्ष आता १७व्या दिवशी दाखल झाला आहे. मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून एका बाजूला सतत हवाई हल्ले सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रत्युत्तरात्मक कारवाया अधिक तीव्र झाल
इराण- अमेरिका- इस्रायल युद्धाचा १७वा दिवस, मध्य पूर्वेत तणाव वाढला


तेहरान , 16 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायलसोबत इराणचा सुरू असलेला संयुक्त संघर्ष आता १७व्या दिवशी दाखल झाला आहे. मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून एका बाजूला सतत हवाई हल्ले सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रत्युत्तरात्मक कारवाया अधिक तीव्र झाल्या आहेत.या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार हादरला आहे, कारण हॉर्मुज सामुद्रधुनीमार्गे जगातील सुमारे पाचवा हिस्सा तेल निर्यात केला जातो. आता इराणने कडक इशारा देत म्हटले आहे की, इराणवर हल्ला करणाऱ्या देशांसाठी हॉर्मुज सामुद्रधुनी आता सुरक्षित राहणार नाही.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी स्पष्ट केले की हा रणनीतिक समुद्री मार्ग अशा कोणत्याही देशासाठी खुला राहणार नाही, जो इराणविरोधात लष्करी कारवाईसाठी त्याचा वापर करू इच्छितो. त्यांनी सांगितले, “जहाजांना केवळ विशेष परिस्थितीतच या सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली जाईल. प्रादेशिक असुरक्षितता ही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे निर्माण झाली आहे.”

बगाई यांनी ठामपणे सांगितले की इराणचे सशस्त्र दल या महत्त्वाच्या मार्गावर पूर्ण नियंत्रण ठेवून आहेत आणि कोणत्याही आक्रमक देशाला त्याचा गैरवापर करू देणार नाहीत. किनारपट्टी राष्ट्र म्हणून राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करण्याचा इराणला पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ‘आक्रमक’ देशांना हा मार्ग वापरण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले. इतिहासात इराणने या जलमार्गातून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या १७व्या दिवशी इस्रायलने तेहरानवर नव्याने हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणी हवाई संरक्षण यंत्रणेने शत्रूच्या ठिकाणांवर लक्ष्य साधले. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ल्यामुळे इंधन टाकीला आग लागली, ज्यामुळे उड्डाणांवर परिणाम झाला. तसेच फुजैरा येथील औद्योगिक क्षेत्रातही आग लागल्याची माहिती आहे. इराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउटची परिस्थिती १७व्या दिवशीही कायम आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की अमेरिकन सैन्य इराणच्या ड्रोन निर्मिती कारखान्यांवर हल्ले करत असून त्यांची उत्पादन क्षमता पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. दरम्यान, इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानंतर मध्य इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले.

इराणच्या चाबहार मुक्त व्यापार क्षेत्राजवळील डोंगरावर असलेल्या लष्करी ठिकाणांवर अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ला केल्याची माहिती व्हॉइस ऑफ अमेरिकाच्या फारसी सेवेकडून देण्यात आली आहे. इराणच्या मरकजी प्रांतात अमेरिका आणि इस्रायलच्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. एका एजन्सीने प्रांतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या हल्ल्यात अराक शहराजवळील निवासी भागाला लक्ष्य करण्यात आले, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या हल्ल्यात मरकजी प्रांतातील महल्लात शहरातील निवासी इमारतीवर हल्ला झाला, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, इराकमधील जुर्फ अल-सखर येथे पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेसच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले, तर बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ ड्रोन दिसल्याची माहिती मिळाली आहे. लेबनानमध्ये इस्रायली भू-कारवाई आणि हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांसह ८५० जणांचा मृत्यू झाला आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे की आज त्यांनी सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २१ ड्रोन नष्ट केले आहेत. ‘एक्स’वर जारी केलेल्या अपडेटमध्ये मंत्रालयाने सांगितले की इराणी हल्ल्यांच्या सुरुवातीपासून आतापर्यंत यूएईने ३०४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, १५ क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १,६२७ ड्रोन निष्क्रिय केले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन लष्करी जवान आणि पाच सामान्य नागरिकांचा समावेश आहे, तर १४५ जण जखमी झाले आहेत.

इस्रायलने दक्षिण लेबनानमधील जाबाल अल-बतूम शहरावर हवाई हल्ला केला असून शहर आणि आसपासच्या भागात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. बहरीनच्या सैन्याने सांगितले की अलीकडील हल्ल्यांदरम्यान आतापर्यंत १२९ क्षेपणास्त्रे आणि २१५ ड्रोन रोखून नष्ट करण्यात आले असून या हल्ल्यांमध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहयोगी देशांना हॉर्मुज सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे; मात्र अनेक देशांनी अद्याप यावर पुढाकार घेतलेला नाही. यानंतर ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर नाटोचे सहयोगी देश हॉर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी मदत करत नसतील, तर या आघाडीचे भवितव्य अत्यंत गंभीर ठरू शकते. उल्लेखनीय म्हणजे, युद्धादरम्यान इराणने या महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गावर प्रभावीपणे निर्बंध लावले आहेत. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा देश मध्यपूर्वेतील कोणत्याही युद्धाचा भाग बनणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोच्या भवितव्य आणि लष्करी सहकार्याबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर स्टार्मर यांनी सांगितले की ब्रिटनची प्राथमिकता स्वतःच्या नागरिकांची सुरक्षा आणि प्रदेशात स्थैर्य प्रस्थापित करणे ही आहे. ब्रिटन कोणत्याही मोठ्या संघर्षात सहभागी होणार नाही आणि शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, दरम्यान तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत असून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. इराणच्या या भूमिकेमुळे युद्ध अधिक काळ लांबण्याची शक्यता असून प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande