
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)।
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख नेते भगीरथ भालके व नगरसेवक नागेश भोसले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भालके-भोसले यांनी प्रवेशाची तयारी केल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. दरम्यान, आज माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भगीरथ भालके यांनी पुणे येथे भेट घेऊन त्यांचा सत्कारही केला आहे.
देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. भालके यांचे पारंपारिक विरोधक माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे हे भाजपमध्ये असल्याने भालके यांनी शिवसेनेचा पर्याय निवडल्याचे समजते. अलीकडेच पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.
तथापि, नगरपालिकेत ३६ पैकी तब्बल २४ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. भाजप नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने भालकेंना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. हीच अडचण लक्षात घेऊन भालके हे आपल्या समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भालके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, बीएसआर, काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे. २०२४ ची विधानसभा निवडणूक भालके यांनी काँग्रेसकडून लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर ते काँग्रेसपासून अंतर राखून होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड