
रायगड, 16 मार्च (हिं.स.) : जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर हिट अँड रनचा प्रकार घडून एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास हाळ गाव हद्दीत दुस्ते मसाला चक्कीसमोर हा अपघात घडला. फिर्यादीचा पुतण्या आपल्या मालकीची रिक्षा घेऊन घरातील मसाला दळण्यासाठी हाळखुर्द येथील दुस्ते मसाला चक्की येथे गेला होता. रिक्षा पार्क करून मसाला चक्कीत दिल्यानंतर तो रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की संबंधित तरुणाच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर वाहन चालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा क्रमांक ९८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १३४/१८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)